मलेशियाच्या एमच ३७० या क्वालालंपूर येथून जाताना ८ मार्च रोजी बेपत्ता झालेल्या विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील बॅटरीज संपल्या असून आता पिंग संदेश मिळणे शक्य नाही असेही सूचित करण्यात आले. या विमानाच्या शोधाचा रविवारी ३७ वा दिवस आहे. पण अद्याप काहीच निष्पन्न झाले नाही. दरम्यान, या विमानाच्या सहवैमानिकाने विमान कोसळण्यापूर्वी फोन केल्याचे वृत्त मलेशियाने फेटाळले आहे.
८ मार्चला बेपत्ता झालेल्या या विमानात २३९ प्रवासी होते. त्यात पाच भारतीयांचा समावेश होता हे विमान हेतुपुरस्सर वळवण्यात आल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. अजूनही या विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचे प्रयत्न सुरू असून त्यात यश आलेले नाही. ऑस्ट्रेलियाच्या समन्वय केंद्राने सांगितले की, गेल्या चोवीस तासात एकही ठोस िपग संदेश मिळालेला नाही. त्यामुळे ब्लॅक बॉक्सची बॅटरी संपली असण्याची शक्यता जास्त आहे. शेवटचा िपग संदेश मंगळवारी मिळाला होता. आता दोन्ही ब्लॅक बॉक्स संदेश देत नसणार असे सूचित होत आहे. १२ विमाने व १४ जहाजे यांनी िहदी महासागरात ५७,५०६  चौरस किलोमीटर क्षेत्रात शोध सुरू ठेवला आहे. ऑस्ट्रेलियाचे ओशन फील्ड हे नौदलाचे जहाज िपगर लोकेटरसह पर्थच्या वायव्येला २२०० कि.मी. अंतरावर आहे.
चीन समानव जलवाहन पाठवणार
चीनने आता बेपत्ता मलेशियन जहाजाचे अवशेष शोधण्यासाठी आपले पहिले समानव असे पाण्याखालून जाणारे वाहन पाठवण्याचे ठरवले आहे. तज्ज्ञांच्या मते ५० कि.मी. त्रिज्येच्या क्षेत्राचा वेध घेतला जाणार असला तरी एकूण हे क्षेत्र ४५०० मीटपर्यंत वाढू शकते त्यामुळे विमान शोधून काढणे अवघड आहे. अमेरिकेने पिंगर लोकेटर व निर्मनुष्य असे ब्लूफिन २१ वाहन पाण्याखालून पाठवले आहे पण त्याला काही संदेश मिळालेले नाहीत. ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतरच सांगाडा सापडू शकेल. या विमानात चीनचे १५४ प्रवासी होते. चीनच्या राज्यकर्त्यांवरही विमानाचे काय झाले हे शोधण्यासाठी दडपण येत आहे.
वैमानिको फोन केल्याचा इन्कार
विमान कोसळण्यापूर्वी सहवैमानिकाने फोन केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. न्यू स्ट्रेटस टाइम्सने अज्ञात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले होते की, सहवैमानिक फारिक अब्दुल हमीद याने विमानातून कॉल केला होता पण तो पटकन तुटला. विमान संदेशवहन मनोऱ्यापासून दूर जात असताना त्याने हा फोन केल्याचे या वृत्तात म्हटले होते. या विमानाचा वैमानिक झहरी अहमद शाह यानेही त्या उड्डाणाच्या वेळी फोन केल्याचे अनधिकृत वृत्त आहे. मलेशियाचे वाहतूक मंत्री हिशामुद्दीन  हुसेन यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांना जेट विमानाच्या कॉकपीटमधून करण्यात आलेल्या फोन कॉलविषयी काही माहिती नाही.
विमानातून फोन कॉल करण्यात आले होते का, या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, माझ्या माहितीप्रमाणे तरी तसे झालेले नाही, तथापि आंतरराष्ट्रीय चौकशी संस्था व पोलीस यांना नवीन काही धागेदोरे मिळाले असतील तर माहिती नाही.
आपल्याला चौकशीत व्यत्यय आणायचा नाही. एफबीआय, चीनचे गुप्तचर, एमआय १६  हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत असे त्यांनी क्वालालंपूर येथे पत्रकार परिषदेत सांगितले. विमान बेपत्ता झाल्यापासून वैमानिक फरिक व झहरी हे छाननीच्या भोवऱ्यात आहेत.