भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची महत्त्वाची मोहीम असलेल्या ‘मिशन गगनयान’साठीची तयारी सुरू झाली आहे. या मोहिमेतंर्गत डिसेंबर २०२२पर्यंत अंतराळवीर अवकाशात जाणार आहे. त्याच्यासाठीच्या जेवणाचा मेन्यू तयार झाला आहे. मैसूर येथील संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेत हे जेवण तयार करण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने मिशन गगनयानला मंजूरी दिल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी दिली होती. या अवकाश मोहिमेबद्दल बोलताना सिवन म्हणाले होते, की या मोहिमेत चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असून, डिसेंबर २०२२पर्यंत गगनयान अवकाशात जाईल,” असं ते म्हणाले होते.

त्यानंतर मिशन गगनयान मोहिमेने वेग घेतला असून, अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांसाठी जेवणही तयार करण्यात आले आहे. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. अंतराळवीरांसाठीच्या जेवणाच्या मेन्यूत एग रोल्स, व्हेज रोल्स, इडली, मूगाच्या दाळीचा हलवा आणि व्हेज पुलाव याचा समावेश असणार आहे. मैसूर येथील संरक्षण अन्न संशोधन प्रयोगशाळेत हे जेवण तयार करण्यात आलं आहे. यात इडलीपासून ते व्हेज पूलापर्यंतचे खास जेवण आणि द्रव्य स्वरूपातील अन्न तयार करण्यात आलं आहे. अवकाश मोहिमेदरम्यान अंतराळवीरांसाठी लागणारे पाणी आणि ज्यूसचीही व्यवस्था मंत्रालयानं केली आहे. खास बाब म्हणजे अवकाशात जेवण गरम करण्यासाठी लागणारे साहित्यही दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जानेवारी २०१८ रोजी गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. केंद्र सरकारनं मंजूरी दिल्यानंतर इस्रोनं या मोहिमेसाठी तयारी सुरू केली. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोग्रामचा भाग आहे. गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचं प्रशिक्षण यावर्षींची सर्वात मोठी घडामोड आहे. जवळपास सात दिवस अंतराळवीर अवकाशात राहणार आहे.