भारताने ‘मिशन शक्ती’ मोहिमेद्वारे अवकाशात उपग्रह पाडण्याची आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर चीन आणि पाकिस्तानने वेगवेगळया पद्धतीने प्रतिक्रिया नोंदवली आहे. भारताने ही मोहिम यशस्वी करुन निवडक तीन देशांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. अमेरिका, रशिया आणि चीन या तीन देशांकडेच हे तंत्रज्ञान आहे.

अवकाश क्षेत्रात सर्व देश शांतता पाळतील अशी अपेक्षा चीनने व्यक्त केली आहे. कुठल्याही देशाने वैज्ञानिक आणि आर्थिक प्रगतीसाठीच अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करावा असे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने केलेल्या या चाचणीचा निषेध करण्याचे आवाहन केले आहे तसेच अवकाशात लष्करीकरण होऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय कायदे बळकट करण्याची गरज व्यक्त केली आहे.

याआधी दुसऱ्या देशांनी जेव्हा अशाच प्रकारच्या क्षमतेचे प्रदर्शन केले तेव्हा त्याचा निषेध करणारे देश अवकाशातील लष्करीकरण रोखण्यासाठी पावले उचलतील अशी अपेक्षा आहे असे पाकिस्तान सरकारच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. पाकिस्तान अवकाशात शस्त्रास्त्र स्पर्धा रोखण्याचा मोठा पुरस्कर्ता आहे असे या प्रवक्त्याने म्हटले आहे. अवकाशात लष्करीकरणाला सुरुवात होईल अशी कृती प्रत्येक देशाने टाळली पाहिजे. प्रत्येक देशाची ती जबाबदारी आहे असे पाकिस्तानने म्हटले आहे.

भारताने आज A-Sat क्षेपणास्त्राद्वारे अवकाशातील आपलाच उपग्रह पाडून नवा इतिहास रचला. या चाचणीद्वारे भारताने अवकाश क्षेत्रातील अत्यंत कठीण समजले जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. ‘मिशन शक्ती’द्वारे भारताने आपण जमीन, पाणी, हवेतच नव्हे तर अवकाशतही युद्ध लढण्यास समर्थ आहोत हे दाखवून दिले आहे. अवकाशात पृथ्वीपासून ३०० किलोमीटर अंतरावर लो अर्थ ऑर्बिटमध्ये असलेल्या उपग्रहाचा भारताच्या A-Sat क्षेपणास्त्राने अचूक वेध घेतला.