नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना केंद्राने ” वाय प्लस ” व्हीआयपी संरक्षण दिले  असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी बुधवारी दिली.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांनी ही सुरक्षा प्रदान केली आहे या पथकाला विशेष सुरक्षा गट (एसएसजी) म्हणून ओळखले जाते. कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेगा रॅलीत मिथुन चक्रवर्ती हे ७० वर्षीय अभिनेते भाजपामध्ये दाखल झाले होते.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “चक्रवर्ती यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा कव्हर देण्यात आले आहे आणि पश्चिम बंगालमधील प्रचार मोहिमेदरम्यान सशस्त्र सीआयएसएफ कमांडोही त्यांच्यासोबत असतील.”  २९४ सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधानसभेची निवडणूक २७ मार्च ते २९ एप्रिल दरम्यान आठ टप्प्यात होणार आहे.

मी कोब्रा आहे असं का म्हटलं?; मिथुन चक्रवर्तीने सांगितलं यामागचं कारण

झारखंडचे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनाही अशाच प्रकारचे सुरक्षा आवरण देण्यात येईल ज्यात सुमारे ५ सशस्त्र कमांडो त्यांचे संरक्षण करतील. या नव्या समावेशामुळे सीआयएसएफ आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवालआणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासह एकूण १०४ व्हीआयपींना संरक्षण देणार आहे.