देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावांच्या घोषणा केली जात आहे. दरम्यान, मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसकडून याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये आपले नाव नसल्याने काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिपेई यांनी सोमवारी यांनी आपल्या पदाचा, सभागृह तसेच काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. आपल्या राजीनामा पत्रात त्यांनी पक्ष सोडण्याचे कारण दिलेले नाही.

सयाहाचे रहिवासी असलेले हिपेई हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते असून ते पलक विधानसभा मतदारसंघातून २०१३ मध्ये मिझोराम विधानसभेवर निवडून गेले होते. त्याचबरोबर ते दोन वेळेस (१९९०-१९९६, १९९६-२००२) राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते.

दोन वेळेस राज्यसभा लढवल्यानंतर हिपेई यांनी यावेळी पलक मतदारसंघातून आपल्याला संधी मिळेल अशी आशा होती. मात्र, मिझोराम काँग्रेसने हिपेई यांच्याऐवजी के. टी. रोखव यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे हिपेई नाराज झाले, आणि त्यांनी तडकाफडकी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

दरम्यान, अद्याप भाजपाकडून पलक मतदारसंघांची उमेदवारी जाहीर न केल्याने या संधीचा फायदा उठवत हिपेई यांनी भाजपाकडून तिकीट मिळेल या आशेने भाजपामध्ये प्रवेश केला. मिझोराममध्ये २८ नोव्हेंबर २०१८ रोजी निवडणूक होणार आहे. तर ११ डिसेंबर रोजी याचा निकाल जाहीर होणार आहे.