आज एकीकडे संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा केला जातोय. पण, मिझोराम याबाबतीत अपवाद ठरलंय कारण येथे योगदिन साजरा केला जात नाहीये असं वृत्त आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, राज्याचे मुख्यमंत्री लल थनहवला आणि त्यांचे कॅबिनेट मंत्री योगदिन साजरा करणार नाहीयेत. इतकंच नाही तर अनेकांना तर योगदिनाबाबत माहितीच नाही. राज्याचे क्रीडा मंत्री जोडिंगतलुआंगा म्हणाले, मला योगदिनाबाबत काही माहिती नाहीये. मी सध्या माझ्या परिसरात आलेल्या पुरामुळे हैराण झालोय आणि अडचणीत सापडलेल्या जनतेची मदत करण्यामध्ये मी व्यस्त आहे.

मिझोराम येथे सध्या कॉंग्रेसचं सरकार आहे, वर्षाच्या शेवटी येथे विधानसभा निवडणूक होणार आहे. येथील लोकसंख्येचा विचार करता येथे ख्रिश्चन समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. योग म्हणजे ख्रिश्चनविरोधी असल्याचं म्हणत ख्रिश्चन समाजाचे लोक वेळोवेळी योगचा बहिष्कार करतात. तर, केंद्र जे काही करेल त्याच्या उलट करावं असंच येथील मुख्यमंत्र्यांना वाटतं म्हणून योगदिन साजकरा करत नाहीये अशी प्रतिक्रिया येथील भाजपा अध्यक्ष जेवी हलुना यांनी दिली.