अइझॉल : मिझोरममध्ये मिझो नॅशनल फ्रंटने (एमएनएफ) मंगळवारी ४०पैकी २६ जागा जिंकून दहा वर्षांनंतर पुन्हा काँग्रेसकडून सत्ता काबीज केली. तेथे ‘एमएनएफ’चे झोरामथंगा यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड झाल्याने ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, हे स्पष्ट झाले.

मिझोरम विधानसभेच्या ४० जागांचे निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आले. एमएनएफने २६ जागाजिंकल्या, तर काँग्रेसचे पाच उमेदवार निवडून आले. भाजपने एक जागा जिंकून खाते उघडले, तर झोराम पिपल्स मूव्हमेंट (झेडपीएम)ने पाच जागा जिंकल्याचे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले.

इशान्येकडील सात राज्यांपैकी मिझोरमची सत्ता दहा वर्षे काँग्रेसकडे होती. परंतु पक्षाने तीही गमावली आहे. मतदारांनी काँग्रेसला सत्तेवरून खाली खेचले आहे. याआधीच्या निवडणुकीत (२०१३) पक्षाने ३४ जागा जिंकल्या होत्या, तर २००८ मध्ये ३२ जागांवर विजय मिळवला होता. या दोन्ही निवडणुका काँग्रेसचे मुख्यमंत्री लाल थनहवला यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. यावेळी ते दक्षिण चंपई आणि ‘सेरछिप’ मतदारसंघांतून पराभूत झाले. त्यांना दक्षिण चंपईतून ‘एमएनएफ’चे टी. जे. ललननलुआंगा यांनी पराभूत केले, तर ‘सेरछिप’मध्ये झोराम पिपल्स मूव्हमेंटचे (झेडपीएम) अध्यक्ष लालदुहोमा यांनी त्यांच्यावर मात केली. ‘सेरछिप’ या घरच्या मैदानावरील पराभव त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. याच मतदारसंघातील मतदारांनी त्यांना सात वेळा निवडून दिले होते.

‘एमएनएफ’चे एफ. लालनूनमाविया यांनी दक्षिण ऐझवाल-३ या मतदारसंघातून कृषीमंत्री के. एस. थंगा यांना २०३७ मतांनी पराभूत केले. माजी विधासभा अध्यक्ष एमएनएफचे लालचामलियाना यांनी ‘ऱ्हांगतुजरे’ मतदारसंघातून विधानसभेतील एकमेव महिला आमदार आणि सहकारमंत्री वनलालवम्पुई च्वांगथू यांचा पराभव केला.

मिझोरममध्ये २८ नोव्हेंबरला मतदान झाले होते. तेथे ८० टक्के मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणी मंगळवारी करण्यात आली. एमएनएफचे उमेदवार पहिल्यापासून आघाडीवर होते. सत्ताधारी काँग्रेसचे उमेदवार पिछाडीवर पडू लागताच मतमोजणी केंद्रांवर जमलेल्या कार्यकर्त्यांनी आणि उमेदवारांनी घरचा रस्ता धरला.

मद्यावरील प्रतिबंध हे विषय निवडणूक प्रचाराच्या केंद्रस्थानी होते. काँग्रेसने मद्यपानावरील र्निबध हटवून परवाना पद्धत लागू केली होती. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘एमएनएफ’ने मद्यपानावर पुन्हा संपूर्ण बंदी घालण्याचे आश्वासन दिले होते. राज्यात ख्रिस्ती समाजाची लोकसंख्या ८७ टक्के आहे. चर्चनीही ‘एमएनएफ’च्या जाहीरनाम्याला पाठिंबा दिला होता.

भाजपचे खाते

ख्रिस्ती समाजाची ८७ टक्के लोकसंख्या असलेल्या या राज्यात भाजपने एक जागाजिंकून खाते उघडले आहे. बी. डी. चकमा ‘तुईच्वांग’ या दक्षिण मिझोरामधील मतदारसंघातून विजयी झाले. ‘आम्ही एक तरी जागाजिंकू अशी आशा होती’, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. व्ही. ल्हुना यांनी व्यक्त केली

कोणत्या पक्षाला किती जागा?

पक्ष                                                       जागा

मिझो नॅशनल

फ्रंट (एमएनएफ)                                     २६

काँग्रेस                                                     ०५

झोराम पिपल्स मूव्हमेंट (झेडपीएम)       ०५

भाजप                                                     ०१

इतर                                                        ०३

एकूण जागा                                             ४०