मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी लॉकडाउनच्या कालावधीमध्ये चक्क १३ पुस्तके लिहून काढली आहेत. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या कालावधीमध्ये पिल्लई यांनी पुस्तके आणि कविता लिहिल्या आहेत. मार्च महिन्यापासून आतापर्यंत पिल्लई यांनी १३ पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये इंग्रजी आणि मल्याळम भाषेतील कविता संग्रहाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे राजभवनामध्ये कुणी येत नसल्याने आपल्याला वेळच वेळ मिळाला आणि त्यामुळे आपण ही पुस्तकं लिहू शकतो असंही राज्यपाल म्हणाले आहेत.

पिल्लई यांनी ‘पीटीआय’शी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे मला पुस्तके वाचवण्यासाठी आणि लिहिण्यासाठी भरपूर वेळ मिळाला असं पिल्लई यांनी म्हटलं आहे. “राजभवनामध्ये कोणालाही येण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. लोकांबरोबर माझा संवादही बंद होता. तसेच निर्बंधांमुळे नियोजित दौरेही स्थगित करण्यात आले होते. त्यामुळेच मला वाचनासाठी आणि लिखाण करण्यासाठी खूप वेळ मिळाला,” असं पिल्लाई म्हणाले.

लॉकडाउनच्या कालावधीमध्ये नियोजित काम केल्यानंतर जास्तीत जास्त वेळ आपण वाचन आणि लिखाणासाठी दिल्याचे पिल्लाई यांनी सांगितले. “मी सकाळी चार वाजता उठायचो. व्यायाम केल्यानंतर वाचन आणि लेखन सुरु करायचो,” असं पिल्लाई सांगतात. लोकांना अधिक शिक्षित बनवण्यासाठी नेत्यांनी आणि वरिष्ठ कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचली पाहिजेत असं मत पिल्लाई यांनी व्यक्त केलं आहे.

पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा कुठून मिळते असा प्रश्न विचारला असता पेशाने वकील असणाऱ्या पिल्लाई यांनी लहानपणापासूनच आपल्याला सार्वजनिक जीवनामध्ये आणि ग्रामीण भागातील राजकारणामध्ये रस होता असं सांगितलं. त्यामुळेच वकिली करताना ग्रामीण भागातील नागरिकांबरोबर मिळून मिसळून राहत असे अशा शब्दांमध्ये पिल्लाई यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. भरपूर साऱ्या लोकांच्या भेटीगाठी, जनसंपर्क यासर्वांमुळेच पुढे नेता झाल्यानंतर पुस्तक लिहिण्यासाठी प्रेरणा मिळाली असं पिल्लाई यांनी स्पष्ट केलं. “करोनाचा जगावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असला तरी याची सकारात्मक बाजूही आपण पाहिली पाहिजे. आपण एकमेकांवर किती अवलंबून आहोत हे या विषाणूने पुन्हा एकदा दाखवून दिलं. या संकटामुळे माणसामाणसांमधील प्रेम वाढलं,” असं पिल्लाई सांगतात. शनिवारी झालेल्या कार्यक्रमामध्ये मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथंगा यांनी त्यांच्या पुस्तकांचे विमोचन केलं.

पिल्लई हे मागील तीन दशकांपासून लिखाण करत आहेत. त्यांचे पहिले पुस्तक १९८३ मध्ये प्रकाशित झालं होतं. राज्यपाल पदावर नियुक्त होण्याआदी त्यांची १०५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत एकूण १२१ पुस्तके लिहिली आहेत.