अकबर यांनी आरोप फेटाळले; कायदेशीर कारवाईचा इशारा

काही पत्रकार महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेले ज्येष्ठ पत्रकार आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी रविवारी राजीनाम्याच्या मागणीस बगल देत आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले. आपल्यावरील आरोप असंस्कृत आणि बिनबुडाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच मी टू वादळ का सुरू झाले, असा प्रश्न उपस्थित करीत यामागे नक्कीच काहीतरी उद्देश आहे, असा आरोपही अकबर यांनी केला.

अनेक महिला पत्रकारांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषण आणि गैरवर्तणुकीचे आरोप केल्याने काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. परंतु त्यांनी राजीनाम्याच्या मागणीबद्दल आपल्या निवेदनामध्ये एका शब्दाचाही उल्लेख केलेला नाही. अनेक महिलांनी आपल्यावर केलेले लैंगिक शोषणाचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. ते द्वेषभावनेतून करण्यात आले आहेत. आरोप करणाऱ्या महिलांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर काही तासांतच अकबर यांनी यासंबंधात एक निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यात त्यांनी आरोपांचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘‘माझ्यावरील लैंगिक गैरवर्तनाचे आरोप बनावट आहेत. अशा आरोपांमुळे माझ्या प्रतिष्ठेचे भरून न येणारे नुकसान झाले आहे. माझे वकील या तथ्यहीन आरोपांबाबत कायदेशीर पावले उचलतील,’’ असे अकबर यांनी स्पष्ट केले. कुठलाही पुरावा नसताना आरोप करणे हा काही वर्गामधील ‘व्हायरल फीव्हर’ आहे. असत्याला आधार नसतो, पण त्यात विष असते. आता मी भारतात परत आलो आहे, त्यामुळे असे आरोप करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा मार्ग चोखाळणार आहे. काही आरोप केवळ ऐकीव गोष्टींवर आधारित आहेत, तर मी काहीच केले नसल्याचेही काहींचे म्हणणे आहे, असे अकबर यांनी नमूद केले.

प्रिया रामाणी यांनी वर्षभरापूर्वी एका नियतकालिकात लेख लिहून ही मोहीम सुरू केली. मात्र ती ‘बातमी’ चुकीची असल्याचे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी माझे नाव घेतले नाही. माझा नामोल्लेख का केला नाही असे अलीकडेच त्यांना विचारण्यात आले, तेव्हा ‘त्यांनी काही केले नाही, म्हणून मी त्यांचे नाव घेतले नाही’, असे ट्वीट रामाणी यांनी केले होते. मी काहीच केले नाही, तर त्यात ‘बातमी’ काय, असा प्रश्न अकबर यांनी विचारला. न घडलेल्या गोष्टीवरून निष्कर्ष काढले गेले, अपमानास्पद टीका करण्यात आली, असेही अकबर यांनी म्हटले आहे. गजमला वहाब यांनी २१ वर्षांपूर्वी कार्यालयात मी त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्या वेळी मी पत्रकारितेत होतो आणि ‘एशियन एज’चे आमचे कार्यालय अगदीच छोटे होते. माझी केबिन काच आणि प्लायवूडची होती. त्यामुळे तेथे मी लैंगिक शोषण केले, असा आरोप करणे विचित्र आहे, असे अकबर यांनी स्पष्ट केले.

मोदींनी मौन सोडावे – काँग्रेस</strong>

केंद्रीय राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन धारण करणे अयोग्य आहे, अशी टीका काँग्रेसने रविवारी केली.  लैंगिक शोषणाच्या प्रश्नाबद्दल मोदी यांनी सरकारचे प्रमुख या नात्याने मत व्यक्त केले पाहिजे. पंतप्रधानांनी मौन सोडून या प्रश्नावर व्यक्त व्हावे. हा केवळ सरकारच्या नैतिकतेचाच प्रश्न नाही तर त्यांच्या आणि त्यांच्या कार्यालयाच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे. शिवाय कृतीतून आपले पंतप्रधान कसे आहेत, हेही लोकांना कळू दे, असे काँग्रेसचे नेते आनंद शर्मा म्हणाले.

विनोद दुआ यांच्यावरही आरोप

चित्रपट निर्मात्या निष्ठा जैन यांनी ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. दुआ यांनी २९ वर्षांपूर्वी (१९८९मध्ये) जनवाणी चॅनेलसाठी मुलाखत घेण्याऐवजी मला अश्लील विनोद सांगण्यास सुरुवात केली. नंतर त्यांनी आपल्या गाडीतही माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या तावडीतून मी निसटले, असेही जैन यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

घईंविरोधात तक्रार अभिनेत्री केट शर्मा हिने रविवारी दिग्दर्शक सुभाष घई यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. घई यांनी मला ६ ऑगस्टला आपल्या घरी बोलावले. घरी गेल्यावर महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्याच्या निमित्ताने त्यांनी मला एका खोलीत नेले आणि जबरदस्तीने चुंबन घेण्याचा प्रयत्न केला, असे केटने तक्रारीत म्हटल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.