परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचे प्रतिपादन

काश्मीरमध्ये उरी येथे दहशतवाद्यांनी केलेला हल्ला म्हणजे तेथील सध्याच्या हिंसाचारग्रस्त स्थितीची प्रतिक्रिया असू शकते व त्याच्याशी आमचा संबंध नाही, असे खोटे सांगून वेळ मारून नेण्याचे पाकिस्तानचे प्रकार यापुढे चालणार नाहीत किंवा त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, असे भारताने म्हटले आहे.

परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी सांगितले, की पाकिस्तान ज्या खोटय़ा सबबी किंवा कारणे सांगून आपला उरी हल्ल्याशी संबंध नाही असे भासवण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्यांच्या या खोटय़ा गोष्टींना न्यूयॉर्क, लंडनमध्ये खचितच कुणी मान्यता दिलेली नाही, किंबहुना त्यावर विश्वास ठेवलेला नाही. आम्ही विश्वासाने असेही सांगू शकतो, की त्यांच्या या सांगण्यावर इस्लामाबादेतही कुणी विश्वास ठेवणार नाही.

शरीफ यांनी लंडन येथे असे सांगितले होते, की उरी येथे लष्करी तळावर झालेला हल्ला हा काश्मीरमधील हिंसाचारग्रस्त परिस्थितीची प्रतिक्रिया असू शकते, त्यावर परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे.अकबर यांनी सांगितले, की भारताची विवेकनिष्ठ व तर्कसंगत भूमिका अनेक महत्त्वाच्या व शक्तिशाली देशांनी खुलेपणाने स्वीकारली आहे. आमचा प्रयत्न सहकार्यातून प्रश्न सोडवण्याचा आहे. दारिद्रय़ निर्मूलन करून विकास साधला गेला पाहिजे हे आमचे उद्दिष्ट आहे. त्याच्या माध्यमातून काही प्रश्न सुटू शकतील, आमच्या या भूमिकेला जगाचा पाठिंबा आहे. विकासाचे फायदे ज्यांना जास्त गरज आहे त्यांना मिळाले पाहिजेत, अशी भारताची भूमिका आहे. दहशतवाद हा मानवी हक्कांचा मोठा शत्रू असल्याचे सांगून ते म्हणाले, की विकासाच्या प्रक्रियेतही दहशतवाद हाच मोठा अडथळा व संकट आहे. जैश-ए-महंमदच्या दहशतवाद्यांनी काश्मीरमध्ये उरी येथे लष्कराच्या तळावर केलेल्या हल्ल्यात १८ सैनिक ठार झाले होते.

 

भारत-पाक संबंध बिघडल्याने ब्रिटनला चिंता

लाहोर : उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये वाढत असणाऱ्या तणावाबाबत ब्रिटनने गंभीर चिंता व्यक्त केली असून, दोन्ही देशांनी सोहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करून हा तणाव कमी करावा, असे ब्रिटनने म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये असणारा तणाव कमी व्हावा अशी आशा ब्रिटन व्यक्त करत आहे. दहशतवाद्यांनी उरीमध्ये हल्ला केल्यानंतर दोन्ही देशांतील वातावरण तणावपूर्ण बनले असून, ब्रिटनला याबाबत चिंता आहे, असे ब्रिटनचे पाकमधील उच्चायुक्त थॉमस ड्रेव्ह यांनी म्हटले आहे.

ड्रेव्ह यांनी या तणावाच्या पाश्र्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांची भेट घेतली असून, परस्परसंबंध, द्विपक्षीय व्यापारामध्ये वाढ करण्यासह पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या काश्मीरबाबत त्यांच्याशी चर्चा केली.

इतर देशांप्रमाणेच भारत आणि पाकमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी ब्रिटन प्रयत्नशील आहे. ब्रिटन दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावाबाबत चिंतित आहे. आम्ही जगभरात कोणत्याही ठिकाणी मानवाधिकाराचे उल्लंघन झाल्यास त्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.