शिक्षक दिनानिमित्त देशभर शिक्षकांच्या, प्राध्यापकांच्या कार्याचा गौरव केला जात असताना मध्य प्रदेशमध्ये बहुजन समाज पक्षाच्या एका आमदारांनी भरसभेत प्राध्यापकांना उद्देशून अपशब्द वापरले आणि संपूर्ण कार्यक्रमाला गालबोट लावले. निमंत्रितांचे स्वागत करताना आपले नाव न घेतल्यामुळे भडकलेल्या आमदारांनी थेट प्राध्यापकांना उद्देशून, मी तुझ्या बापाचा नोकर आहे, ज्यामुळे तू माझे नाव नाही घेतले. सांगू का मी कोण आहे?, अशा आशयाचे विधान केले. ‘आयबीएन ७’ने या संदर्भातील वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. जे. के. मिश्रा करत होते. त्यांनी कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणावेळी बसपच्या आमदारांचे नाव घेतले नाही. त्यांचे नाव घ्यायला ते विसरून गेले. यामुळे आमदार बलवीर दंडोतिया यांचा पारा चढला. त्यांनी अपशब्द वापरतच मिश्रा यांना आपल्याजवळ बोलावले आणि ते म्हणाले, कोण आहेस तू? मी तुझ्या बापाचा नोकर आहे, ज्यामुळे तू माझे नाव नाही घेतले. सांगू का मी कोण आहे? या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री जयभान सिंह पवैया आणि आरोग्य मंत्री रुस्तम सिंह हे सुद्धा उपस्थित होते. पण त्यांनी दंडोतिया यांच्या वर्तणुकीबद्दल कोणताही आक्षेप घेतला नाही.
आपण सर्व निमंत्रितांचे नाव घेणार होतो. त्यांचेही नाव मी घेणारच होतो. पण त्याआधीच त्यांनी मला बोलावले आणि अपशब्द वापरले, असे मिश्रा यांनी म्हटले आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी मी त्यांची माफी पण मागितली, असेही मिश्रा यांनी सांगितले. दरम्यान, मी कोणतेही अपशब्द वापरले नाहीत, असे दंडोतिया यांनी म्हटले आहे.