कर्नाटकातील राजकीय नाट्य अद्यापही सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील कर्नाटकचे काँग्रेस आमदार बंगळुरूमध्ये दाखल झाले. त्यांनी न्यायालयाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्षांची भेट घेतली. यानंतर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष केआर रमेश यांनी माध्यमांना माहिती दिली.

केआर रमेश यांनी सांगितले की, माझ्याशी कोणीही चर्चा केली नाही ते सरळ राज्यपालांकडे पळत गेले. ते करणार तरी काय होते? हा दुरूपयोग नाही का? त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. माझे या देशाच्या घटनेशी व या राज्यातील जनतेप्रती दायित्व आहे. मी उशीर करत आहे कारण माझे या देशावर प्रेम आहे व मी कोणताच निर्णय गडबडीत घेणार नाही.

विधानसभा अध्यक्ष केआर रमेश यांनी सांगितले की, मी या सर्व प्रक्रियेत उशीर करत आहे असे बोलल्या जात असल्याचे मला कळल्यानंतर मी अतिशय दुःखी झालो. राज्यपालांनी ६ जुलै रोजी मला याबाबत माहिती दिली होती. तोपर्यंत मी पदावरच होतो आणि त्यानंतर काही वैयक्तिक कामांसाठी बाहेर गेलो होतो. मात्र या अगोदर कोणत्याही आमदराने मला कळवले नव्हते की ते मला भेटण्यास येत आहेत.

६ जुलै रोजी मी माझ्या कक्षात दुपारी १.३० वाजेपर्यंत होतो. आमदार माझ्या कार्यालयात दोन वाजता आले. त्यांनी यासाठी परवानगी देखील घेतली नव्हती, त्यामुळे हे खोटं आहे की मी पळून गेलो होतो. बंडखोर आमदारांपैकी काही जणांनी सांगितले आहे की, त्यांना काहीजण धमकावत होतो आणि सुरक्षेसाठी ते मुंबईत गेले होते. मात्र त्यांनी असे करण्यापूर्वी माझ्याशी संपर्क साधला पाहिजे होता. मी त्यांना संरक्षण पुरवले असते. या प्रकरणाला केवळ तीन दिवस उलटले आहेत. मात्र जणू काही भूकंपच आला आहे की काय अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली.” असे रमेश कुमार यांनी म्हटले.

तसेच त्यांनी हे देखील सांगितले की,  आता मी रात्रभर या राजीनाम्यांची तपासणी करणार आहे व शोधून काढणार आहे की हे स्वैच्छिक आणि खरेच आहेत की नाही. सर्वोच्च न्यायालयाने मला निर्णय घेण्यास सांगितले आहे. मी सर्व बाबींचे चित्रीकरण केले आहे व ते मी सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवणार आहे.