News Flash

कलबुर्गी मारेकऱ्याची हत्या?

कर्नाटकातील प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या तपासाला अनपेक्षित वळण मिळाले आहे.

धारवाड पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न करता नऊ दिवसांनी मृतदेहाचे दफनही केले.

बेळगावमधील मृताचे संशयिताच्या रेखाचित्राशी साम्य; तपासाला वळण
कर्नाटकातील प्रख्यात विचारवंत एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या तपासाला अनपेक्षित वळण मिळाले आहे. या हत्याकांडातील दोन संशयित मारेकऱ्यांपैकी एका मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी मिळताजुळता चेहरा असलेल्या तरुणाचा मृतदेह बेळगावजवळच्या खानापूरच्या जंगलात सापडल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, १८ ऑक्टोबरला हा मृतदेह मिळाला आणि संशयिताच्या चेहऱ्याशी तो मिळताजुळता असल्याची बाब स्थानिक पत्रकारांनी पोलिसांच्या नजरेस आणूनही धारवाड पोलिसांनी कोणतीही कार्यवाही न करता नऊ दिवसांनी मृतदेहाचे दफनही केले. आता मात्र समाजमाध्यमांत हा प्रकार उघड झाल्याने गुन्हा अन्वेषण अधिकाऱ्यांनी या जंगलात धाव घेतली आहे.
कलबुर्गी हत्याकांडात रूद्र पाटील मुख्य संशयित असून गोविंद पानसरे हत्याकांडातही तो संशयित आरोपी आहे. बेळगावजवळच्या जंगलात मिळालेल्या मृतदेहाच्या चेहऱ्याशी मात्र रूद्रचे साम्य नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. कलबुर्गी यांची धारवाड येथे ३१ ऑगस्टला हत्या झाली होती.
१८ ऑक्टोबरला जंगलात मृतदेह मिळाला तेव्हा एका स्थानिक पत्रकाराने मोबाइलवर मृताचे छायाचित्र काढले होते. कलबुर्गी हत्येतील संशयिताशी त्याचा चेहरा मिळताजुळता असल्याचे त्याच्या प्रथम लक्षात आले. पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले. नऊ दिवस या मृतदेहाची ओळख न पटल्याने पोलिसांनी त्याचे दफनही केले. त्यानंतर या पत्रकाराच्या मित्राने समाजमाध्यमांत हे छायाचित्र झळकविल्यावर पोलीस यंत्रणेला जाग आली.
हत्या सहमतीनेच? हत्या झालेला तरुण पंचविशीतला आहे. त्याच्या पोटात एक आणि डोक्याच्या मागच्या बाजूला एक; अशा दोन गोळ्या घुसल्या होत्या. तर एक जिवंत काडतूसही घटनास्थळी आढळले. हत्या झाली त्या ठिकाणी कोणतीही झटापट झाली नसल्याने मारेकरी हा या तरुणाच्या ओळखीचा होता आणि त्याने स्वत:ची हत्या घडवू दिली, असे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2015 4:39 am

Web Title: mm kalburgi murder case police verifying resemblance of body found with sketch of killer
Next Stories
1 काश्मीरमधील दहशतवादाला पाकचा पाठिंबा होता- मुशर्रफ
2 आता इलेक्ट्रॉनिक्सचे विश्व बदलणार
3 चीनच्या धमक्या झुगारून अमेरिकी युद्धनौका सागरात
Just Now!
X