झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवले आहे. अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, झेडएएनयू-पीएलने मुगाबे यांची पत्नीचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांना पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुगाबे यांनी ५२ वर्षीय पत्नी ग्रेसचे प्रतिस्पर्धी राहिलेले उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते. त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते. मुगाबे यांच्या पत्नीने देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी इच्छा व्यक्त केली होती. मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे. लष्कराने जेव्हा सत्तेवर नियंत्रण मिळवले तेव्हाच मुगाबे यांची प्रशासनावरील पकड ढिली झाल्याचे दिसून आले होते. जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे ९३ वर्षीय राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत चर्चा सुरू झाली होती. नेमके त्याचवेळी लष्कराने ही कारवाई केली.

मुगाबेंना जनरल, झिम्बाब्वेची जनता आणि सत्तारूढ पक्षाकडून मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत होता. मुगाबे हे संरक्षण दलाच्या प्रमुखांबरोबर चर्चा करणार असल्याचे सरकारी वाहिनीवरून कालच घोषित करण्यात आले होते. दोन्ही पक्षांनी चर्चेसाठी सर्वांत आधी गुरूवारी भेट घेतली होती. वर्ष १९८० नंतर म्हणजे स्वातंत्र्यानंतर देशातील जनता पहिल्यांदाच उत्साहित झाल्याचे दिसून आली. मोठ्याप्रमाणात लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मुगाबेंच्या निरंकुश सत्तेला विरोध सुरू केला होता.