ईव्हीएम विरोधी मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देशातील विविध पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्या पार्श्चभूमीवर राज ठाकरे यांनी बुधवारी कोलकात्यात जाऊन मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आहे. कोलकाता राज्याच्या सचिवालयात त्यांची भेट झाली.

या भेटीमध्ये निवडणूक सुधारणा, मतपत्रिकेद्वारे मतदान व राजकीय परिस्थिती यासारख्या विषयावर चर्चा झाली. तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांना ठाकरे यांनी दूरध्वनी केला होता. त्यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली.

ईव्हीएम घालवा आणि बॅलेट पेपर परत आणा ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. लवकरच मनेस ईव्हीएमविरोधात मैदानात उतरणार आहेत. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली होती. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपर आणा अशी मागणी राज ठाकरेंनी केली होती. त्याच पार्श्वभूमीवर जे आंदोलन होणार आहे त्याची तयारी आता राज ठाकरे यांनी सुरु केलेली दिसते आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक काही दिवसात जाहीर होईल. ही निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्यात येणार नसेल तर निवडणुकीवर बहिष्कार टाकू अशी मनसेची भूमिका असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र पुण्यात रविवारी शरद पवार यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत बॅलेट पेपरवर निवडणूक नसेल तर बहिष्कार ही राज ठाकरेंची भूमिका आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं. राज ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार की नाही? हा प्रश्न अद्याप कायम आहे.