मनसे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अशात आता राज ठाकरे राहुल गांधींना भेटणार असल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. काँग्रेस खासदार मिलिंद देवरा यांनी ही भेट ठरवली आहे. राज ठाकरे हे दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात राहुल गांधी यांना भेटतील किंवा राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतील असे समजते आहे. टाइम्स नाऊने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचे लग्न २७ जानेवारीला मुंबईत होणार आहे. मिताली बोरुडे आणि अमित ठाकरे यांचा हा विवाह सोहळा मुंबईतल्या एका आलिशान हॉटेलमध्ये रंगणार आहे. या विवाह सोहळ्याच्या निमंत्रणासाठीच राज ठाकरे राहुल गांधी यांना भेटणार असल्याचं म्हटलं जातं आहे. मात्र या भेटीमागे नेमकं काय कारण आहे हे अद्याप समजू शकलेले नाही. राज ठाकरेंच्या मुलाचा विवाह २७ जानेवारीला होणार आहे. याच विवाह सोहळ्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवरही गेले होते. तिथे त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही लग्न पत्रिका देऊन सहकुटुंब लग्नाचे निमंत्रण दिले. आता राज ठाकरे राहुल गांधी यांना भेटून मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देणार आहेत. यावेळी या दोघांमध्ये काय चर्चा होणार ते पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.