केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत केलं आहे. इतकचं नाही हा निर्णय घेतल्याप्रकरणी मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचे अभिनंदन केलं आहे. याआधी मोदी सरकारच्या एनआरसीला (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी) पाठिंबा दिला होता.

काय निर्णय घेतला आहे मोदी सरकारने?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली.

राज ठाकरे काय म्हणाले?

मोदींनी लोकसभेत दिलेल्या माहितीनंतर राज यांनी ट्विटवरुन राम मंदिरासंदर्भातील निर्णयाचे स्वागत केलं आहे. “केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ह्या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी दिली गेली. ह्या निर्णयामुळे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीला आता वेग येईल अशी अपेक्षा. ह्या निर्णयासाठी संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन,” असं राज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय म्हणाले मोदी?

“सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येतील राम जन्मभूमीच्या एकूण ६७.७० एकर जमिनीवर आता रामलल्लाचा हक्क आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राम जन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्माणासाठी आणि यासंबंधी इतर विषयांवर काम करण्यासाठी सविस्तर कार्यक्रम तयार केला आहे. त्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ नवानं ट्रस्टची स्थापना करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ट्रस्टला राम जन्मभूमीवर भव्यदिव्य मंदिर उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाद्यावरे गहन विचार आणि चर्चा करुन सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे. भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर भविष्यात इथे येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेता सोयी-सुविधा अपुऱ्या पडू नयेत यासाठी एकूण ६७.७० एकर जमीन ज्यामध्ये आतल्या आणि बाहेरच्या अंगणाचा समावेश राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी हस्तांतरीत केली जावी, असा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे,” अशी माहितीही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत दिली.

एनआरसीला राज यांचा पाठिंबा

पाकिस्तान आणि बांगलादेशातून लाखो मुसलमानांनी भारतात घुसखोरी केली असून, त्यांना हाकलून देण्याची गरज आहे. त्यासाठी ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी मनसेच्या राज्यस्तरीय अधिवेशनात केली होती. यामाध्यमातून त्यांनी राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता. “भारत ही धर्मशाळा नाही. त्यामुळे येथे पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना हाकलूनच दिले पाहिजे. सध्या जे काही लोक मोर्चे काढत आहेत त्यांना मोर्चा काढूनच उत्तर दिले जाईल. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, बाहेरून आलेल्यांना कशासाठी पोसायचे, असा सवाल करीत बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरी हाकलण्यासाठी केंद्राला पाठिंबा देण्याची आपली तयारी आहे,” असं राज यांनी आपल्या भाषणात म्हटलं होतं.