चिडलेल्या जमावाने पोलीस ठाण्यात शिरत पोलिसांची चांगलीच धुलाई केल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलीस उप निरीक्षक आणि तीन हवालदारांना मारहाण करण्यात आली. आंध्र प्रदेशातल्या नेल्लोरमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी चार जणांना ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणात चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले होते. याच गोष्टीला विरोध करत १५० जणांचा जमाव या ठिकाणी आला. त्यांनी पोलीस उप निरीक्षक आणि तीन हवालदारांना मारहाण केली. पोलीस आमच्या वस्तीतील लोकांना जाणीवपूर्वक टॉर्चर करत असल्याचा आरोप करत जमावाने या सगळ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

सुरूवातीला या १५० जणांच्या जमावाने पोलीस ठाण्यात प्रवेश केला. त्यानंतर सगळ्या पोलिसांचे मोबाईल हिसकावले. त्यानंतर पोलीस उप निरीक्षक बी लक्ष्मण यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तीन हवालदार या भांडणात पडले तेव्हा त्यांनाही मारहाण करण्यात आली. जेव्हा इतर पोलीस ठाण्यातले पोलीस या ठिकाणी आले तेव्हा या घटनेवर नियंत्रण मिळवण्यात आले.

चार जणांना ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणाच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर हा सगळा प्रकार घडला अशी माहितीही समोर येते आहे. दलित वस्तीतल्या तरूणांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यात येते आहे असा आरोप करत संतप्त जमावाने पोलिसांवरच हल्ला केला आणि एका पोलीस उप निरीक्षकासह तीन हवालदारांना बेदम मारहाण केली.