पंजाबमध्ये तरुणांना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एका तरुणाला जबर मारहाण करण्यात आली आहे. प्रक्षुब्ध जमावाने तरुणाचा हात आणि पाय तोडला आहे. या जबर मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला आहे. २५ वर्षांचा विनोद कुमार अंमली पदार्थांचा तस्कर असल्याची माहिती समोर येते आहे. विनोद कुमार त्याच्या गावी गेला असताना जमावाने त्याच्यावर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये कैद केला. पंजाबमधील भटिंडामध्ये ही घटना घडली आहे.

‘विनोद कुमारला अंमली पदार्थांच्या विक्रीप्रकरणी अटक करण्यात आली होती. तीन ते चार दिवसांपूर्वीच त्याची तुरुंगातून सुटका झाली होती,’ अशी माहिती पोलीस निरीक्षक जगदिश कुमार यांनी दिली. आक्रमक झालेल्या जमावाने हात आणि पाय तोडल्यावर विनोद कुमारला एका जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जमावाकडून सुटका न झाल्याने विनोद कुमारवर वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. पोलिसांनी जमावाच्या तावडीतून विनोदची सुटका करत त्याला फरीदकोटमधील एका रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

वारंवार अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात तक्रारी करुनही पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात असल्याने जमाव आक्रमक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. ‘तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने लोकांमध्ये संतापाची भावना होती. त्यामुळेच लोकांनी अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या विनोद कुमारला जबर मारहाण केली’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

पंजाबमध्ये अंमली पदार्थांची विक्री आणि सेवन हा अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर मुद्दा आहे. मागील विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी अंमली पदार्थाचा मुद्दा प्रचारात वापरला होता. काँग्रेसने याच मुद्याचा आधार घेत अकाली दल-भाजप सरकारविरोधात वातावरण तापवले होते. बेरोजगारीमुळे पंजाबमधील बहुसंख्य तरुणांना अंमली पदार्थांचे व्यसन जडले आहे.