देशात सातत्याने जमावाकडून मारहाणीची प्रकरणे समोर येत आहेत, या प्रकरणांना विनाकारण महत्व दिले जात आहे. असे अजब वक्तव्य उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. काँग्रेस या प्रकरणाला विनाकारण मोठे करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

योगी म्हणाले, जर तुम्ही जमावाकडून मारहाणीबाबत बोलत आहात तर १९८४ मध्ये काय झाले होते. कायदा सुव्यवस्था राखणे हे राज्यांचे काम आहे. काँग्रेसला वाटत आहे की, छोटे मुद्दे मोठे करुन सांगता येतील मात्र यात ते कधीही यशस्वी होणार नाहीत. राज्यस्थानचे भाजपा नेते जसवंत यादव यांच्या म्हणण्याप्रमाणे सर्वांना दुसऱ्यांच्या भावनांचा विचार करायला हवा, असे योगी म्हणाले.

आम्ही सर्वांना संरक्षण देऊ मात्र, प्रत्येक व्यक्ती, समुदाय आणि प्रत्येक धर्माची जबाबदारी आहे की, त्यांनी एकमेकांचा सन्मान करावा. माणूस महत्वाचा आहे तसेच गायही महत्वाची आहे. निसर्गात दोघांचेही आपले-आपले महत्व आहे त्यामुळे दोघांनाही संरक्षण करणे गरजेचे आहे.

संसदेत राहुल गांधींनी मोदींची गळाभेट घेतली होती. यावर भाष्य करताना योगी म्हणाले, सर्व देशभरातून राहुल गांधींच्या या बालिश कृत्यावरुन टीका करण्यात आली आहे. अविश्वास प्रस्तावाने काँग्रेसला उघडे पाडले आहे. यावेळी विरोधकांचे दावे अपरिपक्व होते. हेच त्यांचे खरे रुप आहे.