जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी रविवारी पुन्हा एकदा पाच जिल्ह्यांमध्ये मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. एक दिवस अगोदरच या सेवा सुरू करण्यात आल्या होत्या.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, अफवा पसरण्यापासून रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास पंधवरवाड्यानंतर शुक्रवारी आणि शनिवार दरम्यान रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यांमध्ये कमी गतीची मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० केंद्र सरकारद्वारे हटवण्यात येण्याअगोदर तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची घोषणा करण्या अगोदर ४ ऑगस्ट रोजी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शिवाय या निर्णया अगोदर राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती. यानंतर दोन दिवस अगोदरच जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर येथील पोलिस महानिरिक्षक मुकेश सिंह यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.