हंदवारा व कुपवारा शहरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून र्निबध कायम; इंटरनेटवरील बंदीही सुरूच 

गेले पाच दिवस बंद व निदर्शने यामुळे विस्कळीत झालेले काश्मीरमधील बहुतांश भागातील जनजीवन सुरळीत होण्यास रविवारी सुरुवात झाली. मात्र, मंगळवारपासून पाचजणांचे बळी गेलेल्या हंदवारा व कुपवारा शहरांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून र्निबध कायम ठेवण्यात आले आहेत.

संवेदनशील परिस्थितीत अफवा पसरू नयेत यासाठी काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवांवर घालण्यात आलेली बंदी अद्याप कायम आहे. पीर पंजाल पर्वतरांगांमधून जाणारी काश्मीरमधील बारामुल्ला ते बनिहालदरम्यानची रेल्वे सेवा चार दिवस बंद राहिल्यानंतर रविवारी पाचव्या दिवशी सुरू झाली.

श्रीनगरमध्येही रविवारी शांतता असल्याने कुठलेही र्निबध घालण्यात आले नव्हते. खोऱ्यातही कुठे अप्रिय घटना न घडल्याचे वृत्त नसल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. शनिवारी मोठय़ा प्रमाणावर निदर्शने न झाल्यामुळे, तसेच कुणीही बंदचे आवाहन न केल्यामुळे श्रीनगरच्या सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बुधवारी लागू केलेले र्निबध उठवण्यात आले असल्याची माहितीही त्याने दिली.

असे असले तरी, कुपवारा व हंदवारा या शहरांसह उत्तर काश्मीरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांच्या हालचालींवर लावलेले कठोर र्निबध पाचव्या दिवशीही अमलात होते. राज्यातील मोबाइल इंटरनेट सेवा रविवारीही बंद असली तरी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उद्यापासून ती सुरू केली जाऊ शकते, असे संकेत या अधिकाऱ्याने दिले.

काश्मीर खोऱ्यातील रेल्वे वाहतूक आंदोलनांमुळे चार दिवस बंद राहिल्यानंतर रविवारी सुरू झाली. यापूर्वीच्या आंदोलनांमध्ये रेल्वेचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे  मालमत्तेची हानी टाळण्यासाठी रेल्वे सेवा स्थगित ठेवण्याचा मार्ग अधिकाऱ्यांनी पत्करला होता.

दरम्यान, काश्मीर खोऱ्यात कुठल्याही फुटीरतावादी गटाने रविवारी बंद किंवा आंदोलनाचे आवाहन न केल्यामुळे दैनंदिन कारभार सुरू झाले. रविवार असल्यामुळे श्रीनगरसह इतर काही जिल्ह्य़ांमधील शासकीय कार्यालये आणि शिक्षणसंस्था बंद असल्या तरी दुकाने, पेट्रोल पंप आणि इतर दुकाने चार दिवस बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडली. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही नेहमीप्रमाणे सुरू झाली.

हंदवारा येथे एका सैनिकाने युवतीचा कथित विनयभंग केल्याच्या निषेधार्थ गेल्या मंगळवारी झालेल्या आंदोलनात तीनजण ठार झाल्यानंतर सर्वत्र र्निबध लागू करण्यात आले होते. त्यानंतर दोन दिवस कुपवाडा जिल्ह्य़ातील निदर्शनांमध्ये आणखी दोघे मरण पावल्यामुळे परिस्थिती चिघळली होती.

 

जवानाने विनयभंग न केल्याच्या जबाबावर ‘ती’ मुलगी ठाम

श्रीनगर : ज्या मुलीवरील विनयभंगाच्या आरोपांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार उसळला आहे तिने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आपला जवाब नोंदवला असून, लष्कराच्या कुणाही जवानाने आपला विनयभंग न केल्याचे आपले पूर्वीचा जबाब कायम ठेवला आहे.

या मुलीला तिच्या वडिलांसह शनिवारी सायंकाळी हंडवारा येथील मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात येऊन तिचा जवाब नोंदवण्यात आला. १२ एप्रिलला शाळा सुटल्यानंतर मी मैत्रिणींसह घरी जात असताना हंडवाराच्या मुख्य चौकानजीकच्या सार्वजनिक प्रसाधनगृहात गेली. तेथून बाहेर आल्यानंतर दोन मुलांनी माझ्यावर हल्ला करून मला ओढले आणि माझी बॅग हिसकावली. या दोघांपैकी एक मुलगा शाळेच्या गणवेषात होता, असा जवाब या मुलीने नोंदवल्याचे पोलिसांनी सांगितले.

या मुलीच्या आईने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत जम्मू व काश्मीर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी मुलीला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. पोलिसांनी आपल्या मुलीचा जबाब दबावाखाली नोंदवले असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.