आधार कार्डच्या आधारे देण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद करण्यात येणार नाही, असे केंद्र सरकारने गुरुवारी स्पष्ट केले. भारतातील निम्मे मोबाईल फोन अर्थात ५० कोटी मोबाईल फोन क्रमांक बंद होणार असल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. हे वृत्त खोटं असल्याचेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

५० कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याच्या माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या या खोट्या आणि तार्किक आहेत. सुप्रीम कोर्टाने आधारबाबत दिलेल्या आदेशात असे कुठेही म्हटलेले नाही की, आधार केवायसीद्वारे देण्यात आलेले मोबाईल क्रमांक बंद करावेत. त्यामुळे लोकांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाण्याचे कारण नाही. लोकांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) आणि केंद्र सरकारच्या दूरसंचार विभाग (डॉट) यांनी संयुक्त निवेदनाद्वारे हे स्पष्ट केले आहे.

मात्र, आधारबाबत निश्चित कायदा नसल्याने सुप्रीम कोर्टाने नवे सीमकार्ड हे आधार केवायसीवर देण्यात येऊ नयेत असे म्हटले असले तरी जुन्या मोबाईलचे कनेक्शन बंद करण्याबाबत कोर्टाने काहीही म्हटलेले नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.