मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी विधानसभेत ग्वाही
गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा या दोन मध्यवर्ती कारागृहात मोबाईल, विडी आणि तंबाखूजन्य प्रतिबंधित पदार्थासह पोलिसांनी कैद्यांकडून लसणाची चटणी, बटाटे आणि कांदेही ताब्यात घेतल्याचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. मुख्यमंत्री पटेल यांच्याकडे गृहखातेही असल्याने त्यांनी या प्रश्नावर सभागृहात उत्तर सादर केले.
गेल्या दोन वर्षांत अहमदाबाद आणि वडोदरा येथील मध्यवर्ती कारागृहातून अनेक प्रतिबंधित वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या. त्यात मोबाईल फोन, विडी आणि तंबाखूसारखे प्रतिबंधित पदार्थाचाही समावेश असल्याची माहिती मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी दिली. काँग्रेस आमदाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना पटेल यांनी २०१४ मध्ये अहमदाबादच्या मध्यवर्ती कारागृहातून २९, तर वडोदऱ्याच्या कारागृहातून २० मोबाईल पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगितले, तसेच २०१५ मध्ये अहमदाबाद येथून ३२, तर वडोदऱ्यातून ६ मोबाईल पकडले. काँग्रेसच्या आमदार तेजश्रीबेन पटेल यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. पोलिसांनी विडी आणि सिगारेट असे प्रतिबंधित साहित्यही हस्तगत केले असून स्मोकिंग पाईप, चघळण्याचा तंबाखू, पानमसालाही कारागृहातून मिळाला आहे.
एवढेच नव्हे, तर चहाची पाने, साखर, थर्मासेसही कारागृहात आढळली. ताब्यात घेण्यात आलेल्या वस्तूंबरोबरच लसणाची चटणी, बटाटे, कांदे हे खाद्यपदार्थही सापडले. या खाण्याच्या वस्तूंव्यतिरिक्त नेलकटर, कात्री, तसेच काही कैद्यांकडे रोख रक्कमही सापडली. यावरील पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना एकूण २५३ कैद्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली असून १७३ कर्मचाऱ्यांवर विभागीय चौकशीची कार्यवाही करण्यात आल्याचे मुख्यमंत्री पटेल म्हणाल्या.