सेलफोन म्हणजेच मोबाइल फोनचे चार्जिग हा नेहमी डोकेदुखीचा विषय आहे, कारण चार्जिग संपले आणि चार्जर जवळ नसेल तर पंचाईत होते, परंतु आता वाहतुकीचा, संगीताचा आवाज, फुटबॉल मैदानावरील गोंधळाचा आवाज या सर्वप्रकारच्या आवाजांमुळे तुम्हाला मोबाइल चार्ज करता येईल.
लंडन येथील क्वीन मेरी विद्यापीठातील वैज्ञानिक व नोकिया कंपनी यांनी आवाजापासून ऊर्जा तयार करणारा नॅनो जनरेटर तयार केला असून, त्याचा वापर सेलफोन चार्जिगसाठी करता येईल. रोज आपण जे आवाज ऐकतो त्या सर्वप्रकारच्या ध्वनी ऊर्जेचा उपयोग करून विद्युत ऊर्जा तयार करता येईल. वैज्ञानिकांच्या पथकाने झिंक ऑक्साइडचे गुणधर्म बघितले असता त्यात असे दिसूुन आले, की ते ताणले किंवा पिळले तर त्यातून व्होल्टेजची निर्मिती होते व त्यातील ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत करण्यासाठी नॅनो रॉड्स (सूक्ष्म दंडगोल) वापरले जातात.
नॅनो रॉड्स विविध पृष्ठभागांवर लावता येतात त्यामुळे ऊर्जा मिळवणे सोपे जाते. ज्या पृष्ठभागावर नॅनो रॉड्स बसवले आहेत ते ताणले तर त्यातून जास्त व्होल्टेज निर्माण होते. नॅनो रॉड्स हे स्पंदने व रोजच्या आवाजाने निर्माण होणाऱ्या स्पंदनांना प्रतिसाद देतात. त्यानंतर रॉड म्हणजे दंडगोलाच्या दोन्ही बाजूंना असलेल्या विद्युत संपर्काचा वापर करून व्होल्टेजची निर्मिती केली जाते, त्यामुळे मोबाइल चार्जिग होते असे फिजिक्स डॉट ओआरजी या संकेतस्थळाने म्हटले आहे.
संशोधकांनी प्रथमच नॅनो रॉड्सवर काही रसायने फवारून त्यांना झिंक ऑक्साइडसह प्लॅस्टिकच्या थरात बसवले आहे. जेव्हा रसायनांचे मिश्रण ९० अंशाला तापवले जाते तेव्हा नॅनो रॉड्स सगळय़ा प्लॅस्टिक थरात पसरत जातात.
पारंपरिक पद्धतीने सोन्याचा वापर विद्युत संपर्कासाठी केला जात असे, पण या चमूने अ‍ॅल्युमिनियमचा वापर केला आहे. या यंत्राने ५ व्होल्ट इतके व्होल्टेज तयार होते ते फोन चार्जिगसाठी पुरेसे असते.

बॅटरीच्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी मोबाइल फोन चार्जिग ध्वनीच्या माध्यमातून करण्याची ही कल्पना चांगली आहे व त्याचा वापर प्रत्यक्षात करता येईल. आजूबाजूच्या आवाजांचा वापर करून ध्वनी ऊर्जा ही विद्युत ऊर्जेच रूपांतरित करून व्होल्टेज निर्मिती करून हे चार्जिग करता येणार आहे.
-डॉ. जो ब्रिस्को, क्यूएमयूएल स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मटेरियल सायन्स