काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसचा वनवास संपवण्यासाठी दणक्यात आगमन केले. १५ किमीच्या रोड शोदरम्यान हजारो काँग्रेस कार्यकर्ते प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी जमा झाले होते. रोड शोसाठी जमा झालेल्या या गर्दीचा चोरांनी मात्र चांगलाच फायदा घेतला. चोरांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांच्या महागड्या मोबाइल फोन आणि पाकिटांवर हात साफ केला. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस कार्यकर्त्यांना जेव्हा या चोरीची माहिती मिळाली तेव्हा पोलिसांवर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत धरणे आंदोलनास सुरुवात केली आणि पोलिसांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, कन्नौज आणि बाराबंकी येथून जवळपास दोन डझन कार्यकर्ते प्रियंका आणि राहुल गांधींच्या रोड शोमध्ये सहभागी होण्यासाठी लखनऊमधून आले होते. काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते जेव्हा कानपूर रोडला पोहोचले तेव्हा चोरांनी त्यांच्या महागड्या मोबाइलवर हात साफ केला.

काँग्रेस नेता शान अल्वी यांनी दावा केला आहे की, चोरांनी त्यांचा सव्वा लाखाचा मोबाइल चोरी केला. याशिवाय चोरांनी अनेक नेत्यांच्या खिशातील हजारो रुपये, वाहतूक परवाना आणि एटीएम कार्डसहित अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांची चोरी केली. चोरी झाल्याची माहिती मिळताच संतप्त काँग्रेस नेत्यांनी एका तरुणाला मारहाणदेखील केली. तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात गेले आणि धरणे आंदोलनाला सुरुवात केली. तरुणाने आपल्या अनेक सहकाऱ्यांची नाव सांगितली असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. मात्र तरीही पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप काँग्रेस नेते करत होते.

दरम्यान प्रियंका गांधी यांच्यावर सध्या पूर्व उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली असली तरी २०२२च्या विधानसभा निवडणुकीत त्या काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असण्याचे संकेत देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशात त्यांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करण्यापूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी ही शक्यता वर्तवली आहे. २०१७ मधील उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत ४०३ पैकी केवळ  सात जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या, त्यामुळे काँग्रेसची स्थिती दयनीय अशीच आहे. प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार जाहीर केल्यास काँग्रेसला राजकीय संजीवनी मिळू शकेल असे काँग्रेस नेत्यांना वाटते. १९८९ नंतर उत्तर प्रदेशातील सत्ता ही समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष व भाजप यांच्यात फिरत राहिली आहे. देशातील राजकारणाचे कुरुक्षेत्र असलेल्या उत्तर प्रदेशवर सध्या काँग्रेसचा कुठलाही प्रभाव राहिलेला नाही. प्रियंका यांच्या राजकारण प्रवेशामुळे सध्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून त्यांची वेगळी रणनीती पक्षाला तारण्याची शक्यता पक्षात वर्तवली जात आहे.