भारतात ‘मोबोईल वॉलेट’ इंडस्ट्री सध्या भरात असून दिवसेंदिवस या क्षेत्रातील उलाढालीचा वेग वाढतच आहे. या वाढीसंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध झाला असून त्यानुसार, सध्याच्या वाढीच्या वेगानुसार मोबाईल वॉलेटच्या माध्यमांतून होणारे पैशाचे व्यवहार हे लवकरच ३२ अब्ज रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. तर २०२२ पर्यंत हीच संख्या ३२ ट्रिलियन होण्याचा अंदाज आहे.

‘डेलॉईटी’ नामक एका कन्सलटन्सी कंपनीने हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये मोबाईल वॉलेटच्या माध्यमांतून २०२२ पर्यंत १२६ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. मोबाईल इंटरनेट आणि स्मार्टफोन्सच्या प्रसारानंतर त्यातील मोबाईल वॉलेट्सचे विविध सुरक्षित आणि खात्रीशीर अॅप हे वापरकर्त्यांला जास्त सोईस्कर वाटत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस याच्या लोकप्रियतेत वाढच होत आहे.

मात्र, असे असले तरी यामध्ये काही आव्हानेही कायम आहेत. त्यात लोकांची रोख रक्कम जवळ बाळगण्याची सवय, क्रेडिट कार्डचा वाढता वापर ही या क्षेत्रातील सर्वात मोठी आव्हाने आहेत. त्याचबरोबर डिजिटल पेमेंट टेक्नॉलॉजीचा वापर करताना मोबाईल वॉलेटमधील सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी, आर्थिक फसवणूकीद्वारे होणारे नुकसान या देखील मोठ्या परिणामकारक गोष्टी आहेत. मात्र, असे असले तरी तांत्रिक व्यवस्थेच्या सुरक्षेची हमी ही या आव्हानांवर निश्चित मात करु शकते, असेही या अहवालात म्हटले आहे.

आगामी काळात युनिफाईड पेमेंट इंटरफेस (युपीआय) बाजारात दाखल झाल्यामुळे आगामी काळात या डिजिटल क्षेत्रात अधिकाधिक स्पर्धा निर्माण होणार आहे. त्याचबरोबर या आर्थिक व्यवहारांच्या मुख्य सेवेबरोबरच त्या अनुषंगाने येणाऱ्या इतरही सेवांमध्ये वाढ होण्याची आशा असल्याचे या अहवालात म्हटले आहे.