उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत मते बाद न होण्यासाठी खबरदारी; मतदानाच्या आदल्यादिवशी प्रयोग रंगणार

उपराष्ट्रपतिपदासाठी येत्या शनिवारी (दि. ५) मतदान आहे; पण भाजप व राष्टीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) खासदार कदाचित आदल्या दिवशीच म्हणजे शुक्रवारीच मतदान करतील! दचकू नका.. हे खरेच आहे; पण ते प्रत्यक्ष मतदान नसेल तर मतदानाची रंगीत तालीम (मॉक रिहर्सल) असेल. मते अवैध ठरू नयेत, यासाठी हा अफलातून प्रयोग केला जात आहे.

‘राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत तब्बल २१ खासदारांची मते बाद झाली होती. त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. तसा प्रकार उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत होऊ  नये, यासाठी आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत. त्यातून मतदानाची रंगीत तालीम घेण्याची कल्पना पुढे आली,’ अशी माहिती भाजपच्या संसदीय गोटातून बुधवारी मिळाली.

मतदानाच्या आदल्या दिवशी सायंकाळी पाच वाजता भाजप व एनडीएच्या सर्व खासदारांची बैठक आहे. त्यामध्ये उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान करताना घ्यावयाच्या काळजीची सविस्तर माहिती दिली जाईल आणि त्यानंतर वरिष्ठ मंत्र्यांसह सर्व जण मतदानाच्या रंगीत तालमीत सहभागी होतील. मोदींच्या सहभागाला दुजोरा मिळाला नाही. चुकीच्या पद्धतीने मतदान करणाऱ्यांची चूक तिथल्या तिथे दाखविली जाईल, जेणेकरून इतरांकडून तशा चुका होणार नाहीत.

यामागे आणखी एक हेतू आहे तो म्हणजे मिळणाऱ्या मतांचा अंदाज घेण्याचा. राष्ट्रपतिपदासाठी भाजपच्या राम नाथ कोविंद यांना पाठिंबा देणाऱ्या बिजू जनता दल आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलाने उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत एकत्रित विरोधकांचे उमेदवार असलेले पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉ. गोपाळकृष्ण गांधींना पाठिंबा दिला आहे. तरीसुद्धा भाजप उमेदवार व्यंकय्या नायडूंच्या विजयामध्ये अडचण नसली तरी कोणताही धोका न स्वीकारण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. त्यातून एकही मत बाद होऊ होऊ न देण्याची काळजी घेतली जात आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदार उपराष्ट्रपतिपदासाठी मतदान करीत असतात. ७९०पैकी मतदारांपैकी एनडीएचे संख्याबळ सव्वाचारशेच्या आसपास आहे. अण्णाद्रमुकसारख्या सहयोगी पक्षांचा पाठिंबा धरला तर समर्थनाचा आकडा पाचशेच्या पलीकडे जातो. शनिवारी मतदान आणि लगेचच मतमोजणी आहे. त्यासाठी एनडीएतील सर्वपक्षांनी पक्षादेश जारी केलेला आहे.

राज्यातील भाजप खासदारांची मोदींसमवेत आज न्याहारी

महाराष्ट्रातील भाजप खासदारांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (गुरुवार) सकाळी न्याहारीसाठी निमंत्रित केले आहे. मोदी दररोज वेगवेगळ्या राज्यांतील भाजप खासदारांशी अनौपचारिक संवाद साधत आहेत. महाराष्ट्राबरोबर गोव्यातील भाजप खासदार सहभागी असतील. महाराष्ट्रामधील प्रश्न आणि केंद्राची कामगिरी असे दोन प्रमुख मुद्दे चर्चेला येण्याचा अंदाज आहे.