बॉलिवुड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणामध्ये अटक करण्यात आली असून सध्या ते पोलीस कोठडीमध्ये आहेत. मढ परिसरातील बंगल्यामध्ये सुरू असलेल्या अशाच चित्रीकरणावर पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये धाड घातली होती. त्या प्रकरणात राज कुंद्रा अटकेत असताना आता या अश्लील चित्रपट उद्योग निर्मितीचं कोलकाता कनेक्शन समोर येण्याची शक्यता आहे. कोलकातामधून पोलिसांनी शुक्रवारी एक मॉडेल आणि एका फोटोग्राफरला अटक केली असून मॉडेल्सला अश्लील चित्रपटांमध्ये काम करायला लावून त्या चित्रफिती वेब पोर्टलवर टाकल्याचा आरोप या दोघांवर ठेवण्यात आला आहे. हे व्हिडीओ अपलोड होणाऱ्या वेबसाईट्सचा संबंध थेट राज कुंद्रा प्रकरणाशी असल्याचं एका मॉडेलनं केलेल्या तक्रारीमधून समोर येत आहे.

दोन मॉडेल्सनी केली होती तक्रार!

पोलिसांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, दोन मॉडेल्सनी गेल्या आठवड्यात या प्रकरणात तक्रार दाखल केली होती. आपल्याला जबरदस्तीने अश्लील व्हिडीओंसाठी शूट करायला लावल्याचं या दोघींनी आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं. या आधारावर कोलकात्यातील विधाननगर पोलिसांनी सायबर सेल पोलिसांच्या मदतीने यात सहभागी असलेली मॉडेल आणि फोटोग्राफर यांचा शोध लावला. या दोघांच्या चौकशीतून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे.

कशी होती मोडस ऑपरेंडी?

तक्रार करणाऱ्या मॉडेल्सनी तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, फेसबुकवर फोटोशूटसाठी मॉडेल हवी असल्याची जाहिरात टाकण्यात आली होती. त्यानुसार, या दोघींनी संबंधित जाहिरातदारांशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांना बोलावून त्यांच्यावर पॉर्न व्हिडीओंमध्ये काम करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. येथील बालीगंज रेल्वे स्थानक परिसरात या वर्षाच्या सुरुवातीला हे शूट झालं.

शूट झाल्यानंतर त्यातल्या व्हिडीओ क्लिप्स इंटरनेटवर अपलोड केल्या जात होत्या. वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्लिकेशन्सवर या व्हिडीओ क्लिप अपलोड केल्या जात होत्या. या माध्यमातून एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. “अटक करण्यात आलेले दोघे आरोपी हे अशा वेबसाईट्स चालवणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्यीय रॅकेटचा भाग असू शकतात. यात अजून काही लोकांचा हात असण्याची शक्यता आहे. सध्या हा तपास प्राथमिक स्तरावर आहे”, अशी माहिती वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिल्याचं पीटीआयनं म्हटलं आहे.

राकेश कुंद्रांशी संबंधित वेबसाईट्सचाही समावेश?

दरम्यान, तक्रार करणाऱ्या मॉडेल्सपैकी एका मॉडेलनं दिलेल्या माहितीनुसार, या व्हिडीओ क्लिप्स अनेक वेबसाईट्स आणि मोबाईल अॅप्सवर अपलोड केल्या जात होत्या. त्यातल्या काही वेबसाईट्स या राज कुंद्रा आणि त्यांच्या व्यवसायाशी संबंधित देखील होत्या. त्यामुळे हे खरंच आंतरराज्यीय रॅकेट आहे का? किंवा राज कुंद्रा प्रकरणाचा देखील या रॅकेटशी थेट संबंध आहे का? हे तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे.