करोनावर प्रभावी लस शोधल्याचा दावा अमेरिकेतील मॉडर्ना या फार्मा कंपनीने केला आहे. ही कंपनी तयार करत असलेली लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. लेट-स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीने हा दावा केला आहे. एकाच आठवड्यात लशीच्या चांगल्या कामगिरीचा दावा करणारी मॉडर्ना ही दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

यापूर्वी फाइजर या कंपनीने दावा केला होता की, ते तयार करीत असलेली लस ९० टक्के प्रभावी ठरली आहे. या दोन्ही लशींच्या यशस्वीतेचा जो दावा केला जात आहे तो अपेक्षापेक्षा अधिक चांगला आहे. आजवर बहुतेक तज्ज्ञ मंडळी लशींच्या ५० ते ६० टक्के यशाबाबत सांगत आले आहेत. मात्र, लशीची डिलिव्हरी सुरु करण्याआधी आणखी सुरक्षित डेटाची गरज पडणार आहे. सुरक्षित डेटा समोर आल्यानंतर नियामक मडंळाकडून मंजुरी मिळाली तर अमेरिकेत डिसेंबरपर्यंत दोन करोना लशींचा इमर्जन्सीमध्ये वापर केला जाऊ शकतो.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अमेरिकेत वर्षाच्या शेवटी ६ कोटी डोस उपलब्ध होऊ शकतात. तर पुढील वर्षापर्यंत या दोन्ही लशींचे १०० कोटी डोस अमेरिकेजवळ असू शकतात जी त्यांच्या गरजेपेक्षा अधिक असेल. अमेरिकेची लोकसंख्या सुमारे ३३ कोटी आहे.

मॉडर्ना आणि फायझर दोन्ही कंपन्या बनवत असलेल्या लशी नव्या तंत्रज्ञानानुसार तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये RNA किंवा mRNA नावाच्या मेसेंजरचा वापर करण्यात आला आहे. मॉडर्नाचे प्रमुख स्टीफन होज यांनी म्हटलं की, “आमच्याजवळ अशी लस असेल ज्यामुळे करोनाचा संसर्ग थांबेल.”

मॉडर्नाने हा अंतिम विश्लेषण अहवाल ट्रायलमधील ९५ संक्रमित स्वयंसेवकांच्या आधारे केला आहे. ज्यांना लस किंवा प्लेसबो (शामक औषध) देण्यात आले होते. यामध्ये केवळ ५ लोक असे होते ज्यांना लसीचे दोन डोस दिल्यानंतरही संसर्ग झाला होता. मॉडर्नाची लस फायजरच्या तुलनेत यासाठी चांगली असू शकते कारण याला साठवून ठेवण्यासाठी अतिथंड तापमानाची गरज पडत नाही.