नरेंद्र मोदी म्हणजे भारतीयांना हजारो वर्षांपासून प्रतिक्षा असलेला ‘मसिहा’ असल्याचे वक्तव्य केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी केले. त्या जयपूर येथील जलक्रांती अभियान कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यात बोलत होत्या.  यावेळी उमा भारती यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि युपीएच्या कारभारावरही निशाणा साधला. गेल्या २९ वर्षांत गंगेच्या स्वच्छतेसाठी ५००० कोटींची उधळपट्टी करण्यात आली. मात्र, आता त्याबद्दल मनमोहन सिंग यांना विचारायला गेल्यास ते ‘मैनु की पता’ (मला काय माहित) असे म्हणतील. सुरूवातीला ते ऐकून घेणार नाहीत आणि नंतर मला काहीच माहित नसल्याचे म्हणतील, असे सांगत उमा भारतींनी मनमोहन सिंग यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
मात्र, देशाला पहिल्यादांच ‘मैनु सब पता’ ( मला सगळे माहित आहे), असे म्हणणारा पंतप्रधान मिळाला आहे. मोदींकडे प्रत्येक भारतीयाच्या समस्येवर उत्तर असल्याचेही यावेळी उमा भारती म्हणाल्या. याशिवाय, उमा भारतींनी काँग्रेसकडून त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या धार्मिकतेच्या आरोपांनाही प्रत्युत्तर दिले. काँग्रेस अकारण माझ्या कामाचा संबंध भगवीकरणाशी जोडत आहे. माझ्याकडे सोपविण्यात आलेल्या गंगा स्वच्छता मोहीमेतदेखली त्यांना भगवा अजेंडा दिसतो. मात्र, आमचा मुख्य उद्देश हा गरिबी निर्मुलन आणि आर्थिक विकास साधण्याचा असल्याचे उमा भारती यांनी सांगितले.