जगातील प्रसिद्ध टाइम मासिकाच्या ‘पर्सन ऑफ द इयर’चे नामांकन मिळालेल्या ५० जणांच्या यादीमध्ये यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिलायन्स इंड्रस्टीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि ‘गुगल’चे नवे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांचा समावेश आहे. टाइम पर्सन ऑफ द इयर २०१५ ची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. नरेंद्र मोदी यंदा पर्सन ऑफ द इयर होणार का, यावर चर्चांना सुरुवात झाली आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानानुसार मोदींना १.३ टक्के मते मिळाली आहेत. तितकीच मते सुंदर पिचई आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही मिळाली आहेत.
गेल्यावर्षीही नरेंद्र मोदी यांचे नाव ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ किताबासाठी चर्चेत होते. मात्र, त्यांची निवड झाली नव्हती. त्यावेळी अनेकांनी टाइम मासिकाच्या निवड प्रक्रियेवर आक्षेप घेतला होता. निवडीसाठी गेल्यावर्षी टाइमने घेतलेल्या सर्वेक्षणात सर्वाधिक १६ टक्के मते नरेंद्र मोदी यांना मिळाली होती. सर्वेक्षणात एकूण ५० लाख लोकांनी मत दिले होते. त्यापैकी सर्वाधिक मते नरेंद्र मोदी यांनाच मिळाली होती. मात्र, त्यावर्षी ‘इबोला फायटर्स’ला ‘टाइम पर्सन ऑफ द इयर’ म्हणून निवडण्यात आले होते. जर मोदींना सर्वेक्षणात सर्वाधिक मते मिळाली तर त्यांची निवड का झाली नाही, असा प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला होता.
सर्वसाधारणपणे वर्षभरात सकारात्मक किंवा नकारात्मक कारणांमुळे चर्चेत राहिलल्या व्यक्तीची या किताबासाठी निवड होऊ शकते. मोदींनी गेल्या वर्षभरात देशात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर देशातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशाचे नेतृत्त्व करताना त्यांनी आधुनिकीकरणाच्या दिशेने वेगवेगळे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. काही वेगळ्या विचारांच्या लोकांनी मोदींच्या नेतृत्त्वावर टीकाही केली आहे, असे टाइमने म्हटले आहे.