एनएसजी म्हणजे अणुपुरवठादार देशांचे सदस्यत्व भारताला मिळण्याचा मुद्दा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कस्थानचे अध्यक्ष तय्यीप एर्दोगन यांच्याकडे उपस्थित केला तर भारताच्या स्कॉर्पिन पाणबुडीची माहिती फुटल्याबाबत फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलाँद यांच्याशी बोलताना चिंता व्यक्त केली. जी २० देशांच्या बैठकीनिमित्ताने मोदी यांची दोघा नेत्यांशी भेट झाली. जी २० देशांच्या बैठकीच्या अखेरच्या टप्प्यात मोदी यांनी दोघा नेत्यांची स्वतंत्र भेट घेतली.

स्कॉर्पिनचा मुद्दा उपस्थित

फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सवा ओलाँद यांच्याबरोबर चर्चेत स्कॉर्पिन पाणबुडीबाबतची २२ हजार पानांची गुप्त माहिती फुटल्याचा मुद्दा मोदी यांनी उपस्थित केला. फ्रान्सच्या कंपनीकडून भारताने सहा स्कॉर्पिन पाणबुडय़ा घेण्याचे निश्चित केले असताना त्यातील माहिती फुटली आहे.

जीएसटीबाबत ब्रिटन समाधानी

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचीही भेट घेऊन त्यांनी दोन्ही देशात संधींचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला आहे. थेरेसा मे यांनी जीएसटी विधेयक मंजूर झाल्याने दोन्ही देशातील व्यापार व गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवली तसेच मोदी यांच्या मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी व स्किल इंडिया योजनांना पाठिंबा दिला.

एर्दोगन यांच्याशी चर्चा

एर्दोगन  यांच्याशी चर्चेत पंतप्रधान मोदी यांनी एनएसजी सदस्यत्वासाठी भारत पात्र असून त्याला पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली, असे परराष्ट्र प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितले. तुर्कस्थानने चीनच्या बरोबरीने भारताला एनएसजी सदस्यत्व मिळण्यास विरोध केला होता. भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे त्याला एनएसजी सदस्यत्व देऊ नये, असे चीनने म्हटले होते. तुर्कस्थाननेही भारतात फेतुल्ला गुलेन या मुस्लिम धर्मगुरूच्या बंडखोरांची उपस्थिती असल्याबाबत चिंता व्यक्त केली. तुर्कस्थानबरोबर नागरी हवाई वाहतूक सेवा वाढवण्याचा विषयही चर्चेला आला होता.