CAA, NRC च्या मुद्द्यांवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशाची दिशाभूल करत आहेत असा आरोप काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेससह विरोधीपक्षांची बैठक पार पडली. त्या बैठकीत सोनिया गांधी यांना हा आरोप केला आहे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीत २० पक्ष सहभागी झाले होते. याआधी शनिवारीही त्यांनी मोदी आणि अमित शाह यांना CAA आणून देशात धर्माच्या नावावर विभाजन करायचं आहे असा आरोप केला होता. आता पुन्हा एकदा CAA, NRC वरुन देशाची दिशाभूल केली जाते आहे असा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

आज झालेल्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये सुधारित नागरिकत्व कायदा हा मुद्दाही चर्चेत आलाच. या विरोधात झालेली आंदोलनं, एनआरसी, जेएनयूमध्ये झालेला हिंसाचार या सगळ्या गोष्टीही बैठकीत चर्चिल्या गेल्या. या बैठकीत सोनिया गांधी यांनी मोदी आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.

मोदी आणि अमित शाह यांनी काही आठवड्यांपूर्वी जी वक्तव्यं केली होती आता हे दोघेही ती वक्तव्यं खोडून काढत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्यं केली आहेत. तसंच केंद्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग केला जातो आहे. देशाचं संविधान कमकुवत करण्याचं काम हे सरकार करतं आहे. याविरोधात आम्ही शांत बसणार नाही देशभरात आंदोलन करणार असाही इशारा सोनिया गांधी यांनी दिला.

सध्या लोकांच्या मनात या सरकारविषयी प्रचंड राग आहे. CAA, NRC यावरुन होणारी आंदोलनं हे त्याचंच द्योतक आहेत. जेएनयूसारखा
प्रकार नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घडला. या प्रकरणात दिल्ली पोलिसांची वागणूक क्रूर होती असाही आरोप सोनिया गांधींनी केला.