हुडहुड चक्रीवादळाचा जोरदार तडाखा बसल्यानंतर तातडीने मदतकार्य हाती घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत मंगळवारी जाहीर केली. पंतप्रधानांनी वादळग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावाही घेतला.
या चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणाही या वेळी पंतप्रधानांनी केली.
या चक्रीवादळात किती नुकसान झाले आहे त्याचा पूर्ण आढावा घेण्यात आलेला नाही. मात्र हानीची सध्याची तीव्रता पाहता आपण भारत सरकारच्या वतीने आंध्र प्रदेशला एक हजार कोटी रुपयांची अंतरिम मदत जाहीर करीत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू, मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आणि राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मोदी वार्ताहरांशी बोलत होते. केंद्र सरकार या संकटकाळात आंध्र प्रदेशला सर्वतोपरी मदत करण्यास बांधील आहे, असेही मोदी म्हणाले.
केंद्र सरकारच्या विविध विभागांमधील अधिकारी लवकरच या प्रदेशाचा दौरा करून नुकसानीचा अंदाज घेणार आहेत आणि जनजीवन पूर्ववत होण्यासाठी मदतकार्याला सुरुवात करणार आहेत. विशाखापट्टणमला स्मार्ट शहर बनविण्यासाठी आतापर्यंत आपण उत्सुक होतो, मात्र आता वादळाचा तडाखा बसल्याने पेच निर्माण झाला आहे, असेही मोदी म्हणाले.
‘हुडहुड’ बालके
भुवनेश्वर : हुडहुड चक्रीवादळाचा तडाखा ओदिशातील आठ जिल्ह्य़ांना बसला त्याच दिवशी म्हणजे १२ ऑक्टोबर रोजी आठ विविध रुग्णालयांमध्ये २४५ बालकांचा जन्म झाला, असे आरोग्य विभागाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.ज्या महिला प्रसूत होण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे अशा महिलांचे बाळंतपण सुरक्षित व्हावे यासाठी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करून घ्यावे, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. गजपती, कोरापूत, मलकनगिरी, रायगड, नवरंगपूर, गंजम आणि कालहंडी आदी जिल्ह्यांत १२ ऑक्टोबर रोजी २४५ बालकांचा जन्म झाला, असे आरोग्य संचालक के. सी. दास यांनी सांगितले.बाळंतपण व्यवस्थित व्हावे यासाठी या रुग्णालयांना जनरेट्सच्या साहाय्याने अखंडित विजेचा पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला होता. यापूर्वी फायलीन चक्रीवादळाच्या काळातही आणि त्यापूर्वीच्या १९९९च्या वादळाच्या वेळीही अनेक बालकांचा जन्म झाला होता.