गुजरातचे मुख्यमंत्रीपद १३ वर्षे भूषविल्यानंतर नरेंद्र मोदी आता पंतप्रधान म्हणून नवी दिल्लीस रवाना झाले आहेत. मोदींच्या जीवनातली कुठलीच गोष्ट लपून राहिली नाही. अपवाद, त्यांचा विवाह. मुख्यमंत्रीपदाच्या झंझावातातही त्यांच्या पत्नीविषयी कुणालाच फारशी माहिती नव्हती. लोकसभेच्या रिंगणात ते उतरले आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरले तेव्हा मात्र पत्नी यशोदाबेनना शोधून काढण्यात माध्यमांना यश आले. काँग्रेसने प्रचारात हा मुद्दाही बनवून पाहिला. तरी मोदी मौन बाळगून होते. बडोद्यातून उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी प्रथमच विवाहित असल्याचे नमूद केले आणि विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यशोदाबेन यांनी मात्र मोदींबाबत कधीही कटु उद्गार काढले नाहीत. सध्या तीर्थयात्रेवरून परतलेल्या यशोदाबेन यांना अहमदाबादमध्ये एका गुजराती वर्तमानपत्राच्या प्रतिनिधींनी गाठलेच आणि त्यांना बोलते केले.  मोदी पंतप्रधान झाल्याबाबत काय वाटते, मनात काही कटुता आहे का, शपथविधीला जाणार का, अशा अनेक प्रश्नांना त्यांनी प्रथमच उत्तरे दिली. त्यातील काही प्रश्नोत्तरे अशी :
मोदी पंतप्रधान होतील, असं वाटलं होतं?
२००२ साली एका दूरचित्रवाहिनीच्या पत्रकाराने विचारलं होतं की गुजरात आज भडकला आहे, पुढे काय होईल? मी ठामपणे सांगितलं होतं की गुजरात आज भडकला आहे, उद्या शांत होईल आणि आजचे मुख्यमंत्री उद्या देशाचे पंतप्रधान होतील. गोव्यातील राष्ट्रीय कार्यकारिणीनंतर आणि सद्भावना यात्रांनंतर माझा विश्वास अधिकच दृढ झाला.
जीवनातला सुखाचा प्रसंग कोणता?
माझं अवघं जीवनच सुखानं भरलं आहे. विवाहानंतर माझ्या जीवनात सुखशांती आली.
वैवाहिक  सौख्याबाबत काय वाटतं?
ही माझी खाजगी बाब आहे. मी त्याबद्दल काहीच बोलणार नाही. तीन वर्षांत आम्ही प्रत्यक्षात तीन महिनेच एकत्र राहिलो होतो.
नरेंद्रभाईंशी अखेरचं बोलणं काय झालं?
१ जानेवारी १९८७ या दिवशी आम्ही शेवटचं बोललो. माझा निरोप घेताना त्यांनी हात जोडून मला नमस्कार केला आणि म्हणाले की, हे देवी मला क्षमा करा, मी देशसेवेसाठी जात आहे. समाजाच्या बंधनातून मला मुक्त करा. त्या दिवसानंतर आम्ही एकदाही भेटलो नाही की दूरध्वनीवरून बोललोही नाही. ते जिथे असतील तिथे सुखात असोत, अशीच माझी कायमची प्रार्थना आहे. ते त्यांच्या मार्गाने जात आहेत, मी माझ्या मार्गानं जीवन जगत आहे.
मोदी कुटुंबियांशी काही संपर्क आहे?
हो. अनेकदा हिराबा (मोदी यांची आई) यांच्या भेटीस मी जात असे. त्या मला नेहमीच आईची माया देत. काही दिवसांतच मी त्यांना पुन्हा भेटायला जाणार आहे.
तुम्हाला शिकायची प्रेरणा कोणी दिली?
त्यांनीच (नरेंद्र मोदी यांनी). मी लग्न झालं तेव्हा सातवीपर्यंतच शिकले होते. त्यांनीच प्रोत्साहन दिलं म्हणून दहावीपर्यंत शिकले आणि अध्यापनाचा अभ्यासक्रम केला. ते देशसेवेत गेले आणि मी लहान मुलांना घडविण्याच्या सेवेत स्वत:ला झोकून दिलं.
राजकारणात शिरायची इच्छा आहे?
कदापि नाही. घर आणि भगवंताची भक्ती याच गोष्टींना माझ्या जीवनात अग्रक्रम आहे.
मोदींच्या शपथविधीला जायला आवडेल?
मला आमंत्रण मिळालेलं नाही. मिळालं तर नक्कीच जाईन. त्यांच्या शपथविधीचा आनंद कोणाला होणार नाही?
मनात काही कटुता आहे?
नाही. मुळीच नाही. ईश्वर जे करतो ते चांगल्यासाठीच करतो आणि पुढेही तो चांगलेच करील, असा माझा विश्वास आहे.