‘करोना विषाणू’चा फैलाव वाढल्याने देशात टाळेबंदीसारख्या कठोर उपाययोजना आखाव्या लागत आहेत, त्याबद्दल देशाने मला क्षमा करावी, विशेषत: गरिबांना याचा मोठा फटका बसू लागला आहे. पण, फैलाव रोखण्यासाठी अन्य काही उपाय नव्हता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी सांगितले. विषाणूविरोधातील लढाई सर्व देशवासीयांना जिंकायची आहे आणि ती जिंकू, असा आत्मविश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

साथीच्या काळात आघाडीवर राहून काम करणारे डॉक्टर, परिचारिका, जीवनावश्यक सेवा देणारे कर्मचारी यांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, या कठोर उपाययोजना लागू केल्याबद्दल देशातील जनता क्षमा करील, याची मला खात्री आहे. तुम्ही कुठल्या अडचणीतून जात आहात याची मला जाणीव आहे. काही लोक देश बंद ठेवणारा हा कुठल्या प्रकारचा पंतप्रधान आहे, असे बोलत आहेत, पण अगदी दुर्मीळ परिस्थितीमुळे हे निर्बंध लागू करण्याची वेळ आली.

जे लोक टाळेबंदीच्या र्निबधांचे उल्लंघन करीत आहेत, ते स्वत:च्या जिवाशी खेळत आहेत. कुणी जाणूनबुजून या नियमांचे उल्लंघन करते असेही नाही, पण काही लोक मात्र अकारण निर्बंध तोडत असल्याचे दिसून आले आहे. पण अशा प्रवृत्तींमुळे करोनाचा प्रसार वाढेल हा धोका लक्षात घ्यावा, असा इशारा त्यांनी दिला.

पंतप्रधान मोदी यांनी करोनातून बरे झालेल्या रुग्णांशी संवाद साधला. बंगळूरुचे सॉफ्टवेअर अभियंता राम सूर्या आणि आग्रा येथील अशोक कपूर यांचे अनुभव त्यांनी जाणून घेतले. राम यांनी सांगितले की, विलगीकरणात राहताना तुरुंगासारखा अनुभव येतो हे खरे नाही. लोकांनी नियमांचे पालन केले तरच करोनावर मात करता येईल.

आग्रा येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जी सेवा दिली ती प्रशंसनीय होती. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयातही डॉक्टर आणि परिचरांनी मनोधैर्य वाढवले, असे अशोक कपूर यांनी सांगितले.

भावनिकरीत्या जवळ या..

लोकांना सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ठेवायला सांगितले आहे, याचा कुणी चुकीचा अर्थ काढू नये. काही लोक विलगीकरणातील रुग्ण, डॉक्टर, परिचारिका यांना वाळीत टाकण्याचे प्रकार करीत आहेत. असा सामाजिक बहिष्कार टाकणे योग्य नाही, कारण ही परिस्थिती त्यांनी स्वत: निर्माण केलेली नाही. त्यामुळे अशा कुणाही व्यक्तींना भेदभावाची वागणूक देऊ नये. लोकांनी सामाजिक अंतर वाढवताना भावनिक अंतर कमी करावे. टाळेबंदीत उलट लोकांनी मनांनी एकमेकांच्या जवळ येणे गरजेचे आहे. लोक आता घरात आहेत, त्यांनी एकमेकांची मने जाणून घ्यावीत. जुने छंद पुन्हा जोपासावेत, जुन्या मित्रांशी जोडून घ्यावे, असा सल्ला मोदी यांनी दिला.

फैलाव रोखण्यासाठी सध्या तरी देशाजवळ दुसरा मार्ग नाही. टाळेबंदी हाच एकमेव उपाय आहे. ही जीवन-मरणाची लढाई आहे. त्यामुळेच, या कठोर उपाययोजना करणे भाग पडले. या साथीविरोधात जगभरातील नागरिकांनी एकजूटराखणे गरजेचे आहे. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान