आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून गुजरातचे मुख्यमंत्री व भाजपच्या प्रचार समितीचे प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजप व रा. स्व. संघ यांच्यातील बैठकीत मतैक्य झाल्याचे समजते. भाजप संसदीय मंडळाच्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या अधिवेशनात मोदी यांच्या नावाची घोषणा होईल असा अंदाज आहे. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी व सुषमा स्वराज यांचा असलेला विरोध डावलून मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार करण्याचे ठरले आहे. किमान मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान व दिल्ली या राज्यातील विधानसभा निवडणुका होईपर्यंत तरी मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करू नये, असे अडवाणी व स्वराज यांचे मत होते. संघ परिवारातील वरिष्ठ नेत्यांची बैठक सायंकाळी संपली; त्यातून तरी मोदी यांचे नाव निश्चित झाल्याचे संकेत मिळाले आहेत. भाजप १९ सप्टेंबरला मोदींचे नाव जाहीर करेल असे समजते. संघ व भाजप व्यतिरिक्त विश्व हिंदूू परिषद व इतर १३ संघटनांचे नेते बैठकीस उपस्थित होते. सरसंघचालक मोहन भागवत, विहिंपचे प्रवीण तोगडिया आज उपस्थित होते तर अडवाणी व मोदी हे काल उपस्थित होते. सूत्रांनी सांगितले की, भाजप १३ ते १९ सप्टेंबर दरम्यान संसदीय मंडळाची बैठक घेणार असून त्यात अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. मोदी व संसदीय मंडळाचे काही सदस्य १४ सप्टेंबरला दिल्लीत येत असून त्यानंतर हरयाणात रेवरी येथे मोदी भाजपच्या वतीने सभा घेणार आहेत. १४ सप्टेंबरला भाजप संसदीय मंडळाची बैठक झाली नाही तर २० सप्टेंबरपूर्वी म्हणजे पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी ती घेतली जाईल. मोदी यांच्या वाढदिवशी म्हणजे १७ सप्टेंबरला त्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रा.स्व.संघाचे नेते मनमोहन वैद्य यांनी या मुद्दय़ावर भाजपत मतभेद असल्याचा इन्कार केला आहे.