अभिनेते प्राण यांनी ‘जंजीर’मध्ये साकारलेल्या शेरखानने गायलेली दोस्तीची दास्तान शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुखातून अफगाणी संसदेने ऐकली. ‘यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी’ या ओळींची आठवण मोदी यांनी तेथील संसद सदस्यांना करून दिली आणि या मैत्रीमंत्राने एरवीच्या राजनैतिक रूक्ष भाषणाला भावनेचा ओलावा दिला.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंधांचे वर्णन करताना मोदी यांनी हलके हसतच या गाण्याच्या ओळी म्हटल्या. नंतर श्रोत्यांना त्या समजाव्यात याकरिता त्यांचे इंग्रजीत भाषांतर करून ते म्हणाले की, ‘भारत आणि अफगाणिस्तान यांचा शतकानुशतकांचा संबंध आहे. या काळात भारत अफगाणिस्तानकडे कसे पाहतो हेच यातून दिसते.’
या संपूर्ण भाषणात मोदी यांचा भर होता तो या दोन देशांतील मैत्रपर्वावर. भाषणास प्रारंभच त्यांनी बाल्ख प्रांतातील सुप्रसिद्ध संतकवी जलालुद्दीन रुमी यांच्या एका काव्याने केला. ‘उंच करा आपले शब्द, आवाज नव्हे.. फुले देतो तो पाऊस, गडगडाट नव्हे’ या ओळी उच्चारताच संसदेतून टाळ्यांचा कडकडाट झाला. महाभारतातील गांधारीपासून प्राचीन बौद्ध मूर्तीपर्यंतच्या अनेक गोष्टींचे दाखले देत त्यांनी या दोन राष्ट्रांतील संबंधांची प्राचीनता स्पष्ट केली. अफगाणी लोकांची दिलदारी, शौर्य आणि धैर्य यांचा गौरव करताना त्यांनी आठवण काढली ती ‘जंजीर’मधल्या शेरखानची. भारतीयांच्या मनात अफगाणी लोकांची हीच प्रतिमा असल्याचे त्यांनी सांगितले.
शेरखानप्रमाणेच काबुलीवाल्याचा उल्लेख करून त्यांनी अफगाणी नेत्यांच्या काळजाला हात घातला. काबुलीवाला हे रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेतील पात्र. दिलदार असा तो पठाण. पोटासाठी भारतात आलेला आणि आपल्या ‘बिछडय़ा वतना’साठी, तेथील आपल्या प्रियजनांसाठी झुरणारा. त्या ‘काबुलीवाल्या’ने पुन्हा भारतात यावे, लोकांच्या काळजात स्थान मिळवावे यासाठी दोन्ही देशांचे नागरिक अधिक मुक्तपणे जाऊ-येऊ शकतील अशी व्यवस्था निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही मोदी यांनी या वेळी व्यक्त केली.