करोनाच्या महासाथीविरोधात देशावासीयांना पुन्हा एकत्र येण्याचे कळकळीचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दूरचित्रवाणी संदेशाद्वारे केले. रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी लोकांनी आपापल्या घरातील दिवे बंद करावेत व मेणबत्ती, मोबाइलचा दिवा वा बॅटरीचा दिवा लावून दिव्यांचा झगमगाट करावा. हा प्रकाश म्हणजे करोनामुळे पसरलेल्या अंधकाराविरोधातील लढाई असल्याचे मोदी म्हणाले.

करोनाविरोधातील हा नवा सामुदायिक उपक्रम राबवताना लोकांनी घरातून बाहेर पडू नये. आपापल्या घरात-बाल्कनीत दिवे उजळावेत, अशी सूचनाही मोदींनी केली. २२ मार्च रोजी जनता संचारबंदीत पाच मिनिटे थाळी वाजवण्याचे आवाहन मोदींनी केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनाला लोकांनी रस्त्यावर उतरून प्रतिसाद दिला होता.

रविवारी रात्री नऊ वाजता काही क्षण एकटे बसून भारतमातेचे स्मरण करा, १३० कोटी भारतवासीयांचे चेहरे डोळ्यासोर आणा, सामूहिक महाशक्ती अनुभवा. आताच्या संकट काळात लढण्यासाठी ही ताकद मदत करेल आणि करोनाच्या लढाईत विजयी होण्याचा आत्मविश्वास देईल, असा संदेश मोदींनी जनतेला दिला.

प्रतीकात्मकता थांबवा : विरोधकांची टीका

मोदींच्या या उपक्रमावर विरोधी पक्षांनी तीव्र टीका केली. प्रतिकात्मकता दाखवण्यापेक्षा वास्तव समस्येला सामोरे जा, असा सल्ला विरोधकांनी दिला आहे. स्त्री-पुरुष, उद्योजक-रोजंदार मजूर तुमच्याकडून आर्थिक घोषणांची अपेक्षा करत होता. गडगडलेल्या अर्थकारणाला टेकू देण्यासाठी कोणते प्रतिबंधात्मक उपाय केले जातील याकडे डोळे लावून होता, अशी टीका माजी अर्थमंत्री व काँग्रेसचे नेते पी. चिदम्बरम यांनी केली. मोदींनी पुन्हा देश ‘राम भरोसे’ सोडून दिल्याची टीका काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केली. नऊ आकडय़ाचे औचित्य साधण्याचा हा प्रयत्न असल्याची टिप्पणी त्यांनी केली. दिवे प्रज्ज्वलित करण्यापेक्षा देशाला आठ ते दहा टक्के विकासदराची गरज आहे. खऱ्या प्रश्नाकडे वळा, बनावट वृत्ताचे कारण देत प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणण्याचे थांबवा, अशी तीव्र प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी व्यक्त केली. विवेकाचा दिवा पेटवा, अंधश्रद्धेचा नको, अशी मार्मिक टिप्पणी काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली. पंतप्रधानांनी आतातरी गंभीर व्हायला हवे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.