ज्यांनी काश्मीरच्या स्वांतत्र्यासाठी आपले प्राण दिले. तसेच जे वैयक्तिकरित्या भारतीय लष्कराच्या गोळ्यांना दगडाने उत्तर देत आहेत. त्यांना अल्लाह पाहत आहे. इतकेच नाही तर आपला जीव जात असतानाही ते पाकिस्तान आणि काश्मीरच्या एकतेबाबत बोलत आहेत. हे काश्मीरात सुरु झालेले नवे युग असून याला आता मोदी देखील थांबवू शकत नाही, अशा शब्दांत मुंबईवरील हल्ल्याचा सुत्रधार आणि लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईद याने भारताविरोधात गरळ ओकली आहे.

काश्मीरमध्ये हिंसाचार घडवून आणण्याची जाहीर चिथावणीही त्याने आपल्या समर्थकांना दिली आहे. लाहोरमधील गद्दाफी स्टेडिअममध्ये निवडणूक प्रचारादरम्यान जाहीर सभेत तो बोलत होता. काश्मीरमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आपला राजकीय पक्ष जमात-उद-दावासाठी तो प्रचार करीत आहे. या पक्षाकडून हाफिजचा मुलगा आणि जावई यांच्यासह २६५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पाकिस्तानच्या संसदेत आपल्या पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हाफिज प्रयत्नशील आहे. हिंदुस्तान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

हाफिज म्हणाला, काश्मीरमध्ये आता नवे युग सुरु झाले असून काश्मीर स्वतंत्र व्हावा ही अल्लाहची इच्छा आहे. काश्मीरमध्ये आजवर मोठ्या प्रमाणावर रक्तपात झाला असून अल्लाह हे सर्व पाहत आहे. तोच याबाबत निर्णय देईल. सर्व निर्णय हे स्वर्गातून येतात वॉशिंग्टनमधून नव्हे त्यामुळे काश्मीर मुक्त असेल असा आदेश लवकरच स्वर्गातून येईल.

आपल्याला पाकिस्तान हे अल्लाहचे स्वतंत्र राष्ट्र बनवायचे असून सर्व मुस्लिम बांधवांचे रक्षण करायचे आहे, त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. संपूर्ण मुस्लिम जगताचे नेतृत्व करण्याची क्षमता पाकिस्तानमध्ये आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. आपल्याला आपल्या प्रेषिताने दिलेले ध्येय साध्य करण्यासाठी स्थिर रहायला हवे. त्यासाठी आपल्याला वेगाने काम करायला हवे, त्यामुळे मुस्लिम जगताचे तिसरे युग सुरु होईल, असेही हाफिजने रॅलीत म्हटले आहे.

सईदच्या लष्कर-ए-तोयबा या संघटनेने काश्मीर खोऱ्यात सर्वाधिक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. स्थानिक काश्मीरी तरुणांना भडकावून येथील सुरक्षा रक्षकांवर दगडफेक करण्यासही त्यांना प्रवृत्त केले आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा प्रतिनिधी म्हणून दगडफेक करणाऱ्या काश्मीरी तरुणांना आणि दहशतवाद्यांचा तो वापर करुन घेत आहे.