नुकत्याच सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ‘मोदी केअर’ योजनेची घोषणा केली होती. ही जगातील सर्वांत मोठी आरोग्य योजना असल्याचा दावा जेटलींनी केला होता. ही आरोग्य योजना कैशलेस स्वरुपात असणार आहे. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी जनतेला बराच काळ वाट पहावी लागणार आहे. कारण आठ महिन्यांनंतर ही योजना लागू होणार असून त्यासाठी गांधी जयंतीचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. त्यामुळे येत्या २ ऑक्टोबरपासून या योजनेला सुरुवात होणार आहे.


राष्ट्रीय स्वास्थ संरक्षण योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या या ‘मोदी केअर’ योजनेसाठी गरज पडल्यास निधीची मर्यादाही वाढवण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत देशभरातील ४० टक्के लोकसंख्येला म्हणजेच १० कोटी कुटुंबांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडल्यास ५ लाखांपर्यंतच्या उपचारांसाठी वीमा सुरक्षा देण्यात येणार आहे.

जेटलींनी सांगितले की, या योजनेंतर्गत माध्यमिक आणि उच्चस्तरीय रुग्णालयांत उपचारांसाठीच्या खर्चाचा वीमा मिळणार आहे. यामध्ये सर्व सरकारी रुग्णालये आणि काही निवडक खासगी रुग्णालयांचा समावेश असणार आहे. ही योजना विश्वास आणि विम्याच्या मॉडेलवर आधारित आहे. या योजनेवर आणखी संशोधन सुरु असून यासाठी नीति आयोग आणि आरोग्य मंत्रालयामध्ये चर्चा सुरु आहे. ही योजना पुढील आर्थिक वर्षात लागू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

एका ओपन मॅगझिनद्वारा आयोजित कार्यक्रमात जेटली बोलत होते. ते म्हणाले, वीमा मॉडेल तयार झाल्यानंतर जसजशी वीमाधारकांची संख्या वाढेल तसा त्यावरील हप्ता कमी होईल.