पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका, दहशतवादामुळे अणुसुरक्षेचा धोका वाढला!

अण्वस्त्र तस्कर व दहशतवादी यांच्याशी काही देशांचे छुपे संबंध असून त्यामुळे अणुसुरक्षा धोक्यात आली आहे, त्यामुळे अमुक एक त्यांचा दहशतवादी आहे, माझा नाही हा समज सोडून देण्याची गरज आहे, असे मत व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर अप्रत्यक्ष टीका केली.

ब्रसेल्स येथे अलीकडेच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करून त्यांनी सांगितले की, दहशतवादामुळे अणुसुरक्षेचा धोका वाढला आहे व तो वास्तव असून त्यामुळे मोठी जोखीम निर्माण झाले आहे. त्यावर मात करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन सर्वच देशांनी करणे गरजेचे आहे. आजच्या काळात आपण गुहेत राहणाऱ्या माणसांचा शोध घेत नाही, तर शहरातील संगणक व स्मार्टफोनने सुसज्ज असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहोत. काही देशांचे अण्वस्त्र तस्कर व दहशतवादी यांच्याशी छुपे संबंध आहेत. दहशतवादी आता २१ व्या शतकातील तंत्रज्ञान वापरत आहेत पण त्याला आपला प्रतिसाद प्रगत तंत्रज्ञानावर आधारित नाही. दहशतवादाच्या साखळ्या जागतिक पातळीवर आहेत पण त्या तुलनेत देशांमधील सहकार्य तेवढे नाही. व्हाईट हाऊस येथे अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आयोजित केलेल्या मेजवानीप्रसंगी मोदी बोलत होते. दहशतवाद हा कुणा दुसऱ्यांचा प्रश्न आहे असे समजू नका, अमुक दहशतवादी त्याचा अमुक माझा असे समजू नका. दहशतवाद ही जागतिक समस्या आहे पण आपण त्याचा मुकाबला केवळ देशपातळीवर करीत आहोत. व्हाइट हाउसमध्ये मोदी भोजनप्रसंगी ओबामा यांच्या शेजारी बसले होते.

या वेळी एकूण वीस देशांचे

प्रतिनिधी उपस्थित होते. अणुसुरक्षा हा राष्ट्रीय प्राधान्याचा विषय असला पाहिजे, सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियम पाळले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. ओबामा यांनी अणु सुरक्षेसाठी घेतलेल्या पुढाकाराचे त्यांनी स्वागत केले.