अणुपुरवठादार गटात(एनएसजी) भारताला स्थान मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्न करत असताना चीनचा अडथळा निर्माण होऊ नये म्हणून मोदींनी रशियाला साद घातली आहे. मोदींनी थेट रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना फोन करून याबाबत चर्चा केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. एनएसजीमधील समावेशासाठी अमेरिकेचा पाठिंबा मिळाला असला तरी आशिया खंडातून चीन भारताच्या प्रयत्नांमध्ये अडथळा निर्माण करत आहे. भारताला आणखी एक वर्ष एनएसजीतील समावेशापासून दूर ठेवण्याचा चीनचा मानस आहे. चीनचा हा प्रयत्न उलथून पाडण्यासाठी मोदींनी थेट पुतीन यांना फोन करून सहकार्याची विनंती केल्याचे समजते. दरम्यान, मोदी आणि पुतीन यांच्यात झालेल्या चर्चेचे रशियन सरकारने निवेदन जाहीर केले असून, दोघांत द्विपक्षीय संबंधांना अधिक बळकटी येण्यासाठीची चर्चा झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.