करोना लसीकरण रणनीतीबाबत चर्चा आणि पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या सोमवारी (ता. ११) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे शुक्रवारी सूत्रांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्र्यांशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधतील आणि लसीकरण मोहीम सुरू करण्याबाबत आढावा घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष लसीकरण सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी दिली. लसीकरणासाठी सर्व यंत्रणांची सज्जता तपासण्यासाठी आणि कुठेही त्रुटी राहू नयेत यासाठी दुसरी सराव फेरी शुक्रवारी घेण्यात आली.

पंतप्रधान मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लसीकरण सराव फेरीतील अनुभवांवर चर्चा करतील. तसेच राज्य स्तरावरील लसीकरण व्यवस्थापनाची माहितीही घेतली जाईल. प्रत्यक्ष लसीकरणासाठी राज्यांच्या सूचनांचाही विचार केला जाईल. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे तीन कोटी करोनायोद्धय़ांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील आणि जोखमीच्या गटांतील व्यक्तींचे लसीकरण करण्यात येईल.

केंद्रीय औषध महानिरीक्षकांनी सीरम संस्थेची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन या दोन लशींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी केंद्र सरकारने लसखरेदी केली असून साठवणुकीसाठी शीतकोठारे, वितरण व्यवस्थाही सुसज्ज ठेवली आहे. लसीकरणासाठी केंद्राची तयारी पूर्ण झाली आहे. लसीकरण कार्यक्रमाची अद्ययावत माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

जोखमीच्या व्यक्तींनंतर सर्वाचे लसीकरण : हर्षवर्धन

जोखमीच्या गटांतील व्यक्तींचे लसीकरण केल्यानंतर लवकरच देशातील सर्वाचे लसीकरण करण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी शुक्रवारी सांगितले. लस दिल्यानंतर प्रत्येकाला इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्रमाणपत्रे देण्यात येतील. भारताने अतिशय कमी वेळेत लस विकसित करण्यात मोठी कामगिरी केल्याचे ते म्हणाले.

नाकावाटे घेण्याची लसही तयार : लसीकरणास परवानगी दिलेली कोव्हॅक्सिन लस उत्पादित करणारी भारत बायोटेक कंपनी नाकावाटे घेण्याच्या करोना प्रतिबंधक लशीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीला फेब्रुवारी-मार्चमध्ये प्रारंभ करणार आहे. तशी घोषणा कंपनीने शुक्रवारी केली.

‘फायझर’ची लस नवकरोनावर प्रभावी : फायझर आणि बायोएनटेक यांनी विकसित केलेली करोना प्रतिबंधक लस ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेमधील नवकरोनावर परिणामकारक असल्याचे ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.