बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यावर स्तुतिसुमने उधळताना पंतप्रधान मोदी यांनी ‘एक महिला असूनही’चा प्रयोग केल्याने त्यांच्यावर विरोधकांसह ट्विटरवर टीकांचा भडिमार सुरू झाला आहे. मोदी हे ‘पुरुषी मनोवृत्तीचे’ असल्याची टीका काँग्रेसने केली असून नेटकऱ्यांनी मोदींना लैंगिक भेदभाव करणारा असल्याची टीका केली आहे.
हसिना यांची स्तुती करताना मोदी यांनी त्या महिला असूनही त्यांनी दहशतवादाचा यशस्वी सामना केला आहे, असे वक्तव्य केले होते. यावरून मोदींवर सोमवारी सकाळपासून ट्विटरवर टीका होत आहे. या वेळी मोदींच्या पाठीराख्यांनीही याला चोख प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
मोदींच्या या वक्तव्यातून संघाची महिलाविरोधी भूमिका दिसून येते. ते कधीही महिलांचा आदर करत नाहीत. जेव्हा इंदिरा गांधींनी १९७१ मध्ये युद्धात पाकिस्तानला धूळ चारली होती, तेव्हा माजी पंतप्रधान वाजपेयी यांनीही असाच पुरुषी मनोवृत्तीचा शेरा मारला होता, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या शोभा ओझा यांनी केली.
यावर बचाव करताना भाजपने, मोदींनी बांगलादेशमधील सत्यपरिस्थितीवर आधारित वक्तव्य केल्याचे स्पष्ट केले.

‘कमकुवत मान्सूनला संधीत परावर्तित करा’
यंदा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संकटाला संधीमध्ये परावर्तित करण्याचा सल्ला अधिकाऱ्यांना दिला आहे. याचा फायदा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी शेतांमध्ये तळी निर्माण करण्यात करा, असे मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी त्यांनी देशात पाण्याचे संवर्धन करण्याच्या विविध योजनांवर भर दिला.