चीनमधल्या सरकारी बँकेने फक्त भारतामध्ये गुंतवणूक करण्यासाठी वाहिलेला गुंतवणूक फंड दाखल केला आहे. चिनी गुंतवणूकदारांना दोन अंकी परतावा मिळवण्यासाठी भारतीय बाजारपेठ आकर्षक असल्याचं सांगत चिनी बँकेने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्वास दाखवल्याचं मानण्यात येत आहे. क्रेडिट स्विस इंडिया मार्केट फंड या नावानं इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायनानं हा फंड दाखल केला आहे. केवळ भारतात गुंतवणूक करण्यासंदर्भात वाहिलेला हा पहिलाच फंड असल्याचे ग्लोबल टाइम्स या सरकारी वृत्तपत्रानं म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीनमध्ये अध्यक्ष शी जिनपिंग यांची अनौपचारीक भेट घेतल्याला पंधरा दिवस होत नाहीत तोच हा निर्णय समोर आला आहे. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढणार असल्याचे प्रशस्तीपत्रक बँकेने आपल्या अहवालात दिले आहे.

चीनबाहेरच्या जगामध्ये विकसनशील देशांमध्ये भारतीय शेअर बाजारात दीर्घकालीन दृष्टीनं सकारात्मक वातावरण असल्याचं मत तज्ज्ञांनी नोंदवलं आहे. भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढेल यात काहीही संदेह नाही असं ग्लोबल टाइम्समध्ये तज्ज्ञांच्या हवाल्यानं नमूद करण्यात आलं आहे.
जर भारतीय शेअर बाजारात पैसे गुंतवले तर 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीनं परतावा मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. विशेषत: आर्थिक क्षेत्रातल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये जास्त प्रमाणात गुंतवणूक करण्याचा या फंडाच्या व्यवस्थापकांचा विचार आहे. त्याखेरीज भारतीय आयटी कंपन्यास ऊर्जा क्षेत्र, फार्मा कंपन्या, आरोग्य व अन्य उद्योगांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीस प्राधान्य देण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन भेटीनंतर ही घोषणा करण्यात आल्यामुळे तसेच वेगवेगळ्या संस्थांकडून भारतीय अर्थव्यवसथा सात टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने वाढेल असा निर्वाळा मिळाल्यामुळे ही एकप्रकारे मोदी सरकारला दिलेली चांगल्या कामाची पावतीच समजण्यात येत आहे.