देशामध्ये दिवसोंदिवस करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक ऐतिहासिक घोषणा करत संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाउन राहिल अशी घोषणा केली आहे.  “जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश २१ दिवसांसाठी लॉकडाउनमध्ये जात आहे,’ अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. मात्र हा कालावधी २१ दिवसांचा का असणार आहे हे ही मोदींनी आपल्या भाषणामध्ये स्पष्ट केलं आहे.

करोनाचे संक्रमण कसे होते हे नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये सांगितले. “जगभरातील अनेक देशामध्ये कोरनाचा प्रसार झाला आहे. याच पार्श्वभूमीवर तेथील मागील दोन महिन्याच्या परिस्थितीचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की करोनाचा संक्रमण होण्याची सायकल मोडण्यासाठी किमान २१ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळेच पुढील २१ दिवस भारतामध्ये संपूर्ण लॉकडाउन असेल,” असं मोदींनी सांगितलं. “याचा आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसणार असला तरी प्रत्येक भारतीयाचा जीव वाचवणे हीच भारत सरकारची प्रथमिकता आहे,” असंही मोदींनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं.

“करोनाची लागण झालेली व्यक्ती सुरुवातीला ठणठणीत वाटते. आपल्याला आजार झाला आहे हे अनेकांच्या लक्षातही येत नाही. त्यामुळे विशेष काळजी घ्या,” असंही मोदींनी सांगितलं.

“पहिला एक लाख लोकांना संसर्ग होण्यासाठी ६७ दिवस लागले त्यानंतर पुढील दोन लाख लोकांना संक्रमण होण्यासाठी केवळ ११ दिवस लागले यावरुनच हा रोग किती भयंकर आहे याचा अंदाज लावता येतो. दोन लाख लोकांपासून तीन लाख लोकांना संक्रमण होण्यासाठी केवळ पुढील चार दिवस लागले हे त्याहून भयंकर आहे,” असं मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

भारतासारख्या देशाला करोनावर मात करायची असेल तर घरात थांबणे हा एकमेव पर्याय आपल्या समोर आले. सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय असून आपण सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे. आजपासून संपर्ण देश २१ दिवस लॉकडाउन असेल, असं मोदींनी स्पष्ट केलं.