संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचा ऑगस्टमधील अध्यक्ष म्हणून दहशतवादाचा मुकाबला, शांतता रक्षण व सागरी सुरक्षा या बाबींना प्राधान्य देण्यात येईल, असे भारताने रविवारी म्हटले आहे.

भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी राजदूत टी.एस तिरुमूर्ती यांनी दृश्यफीत संदेशात शनिवारी सांगितले, की सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भारताला ऑगस्ट महिन्यासाठी मिळाले आहे ही आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. भारत ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत असताना हा  बहुमान मिळाला आहे. भारताने रविवारी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. फ्रान्सने हे अध्यक्षपद भारताला मिळण्यासाठी दिलेल्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभारी आहोत. दोन्ही देशांचे ऐतिहासिक व दृढ संबंध आहेत असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचा अध्यक्ष म्हणून भारत या महिन्यात अनेक बैठकांचे आयोजन करून त्यात वेगवेगळे विषय हाताळणार आहे. सीरिया, इराक, सोमालिया, येमेन, पश्चिम आशिया यांसारखे अनेक मुद्दे विषयसूचीवर असू शकतात. सुरक्षा मंडळ सोमालिया, माली, संयुक्त राष्ट्रांचे लेबनॉनमधील अंतरिम सुरक्षा दल याबाबत ठरावांना मंजुरी देण्याची शक्यता आहे, असे तिरुमूर्ती यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे, की भारत हा नेमस्त आवाज आहे, आम्ही संवाद व आंतरराष्ट्रीय कायद्याला महत्त्व देतो. सागरी सुरक्षा, शांतता रक्षण, दहशतवाद विरोध या गोष्टींना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भारत आंतरराष्ट्रीय नियम व संकेत यांचे पालन करील, अशी अपेक्षा पाकिस्तानने व्यक्त केली आहे.

मोदी अध्यक्षस्थान भूषवणारे पहिले पंतप्रधान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणारे पहिले पंतप्रधान असतील, असे संयुक्त राष्ट्रातील माजी स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले, की ७५ वर्षांत भारतीय राजकीय नेतृत्व प्रथमच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळाचे अध्यक्षपद भूषवित आहे. त्यामुळे आता भारत आघाडीवर राहून नेतृत्व करण्याच्या स्थितीत आहे. परराष्ट्र धोरणात भारताने केलेल्या कामाला मिळालेले हे फळ आहे. ही आभासी बैठक असली तरी ती ऐतिहासिक आहे. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव १९९२ मध्ये सुरक्षा मंडळाच्या बैठकीस उपस्थित होते.