“मोदी सरकारने प्रियंका गांधी यांची सुरक्षा आणि निवासस्थान काढून घेणे हे दुर्देवी आहे. प्रियंका यांनी आपली आजी (माजी पंतप्रधान इंदिरा गांधी) आणि वडील (माजी पंतप्रधान राजीव गांधी) यांचा भयानक मृत्यू पाहिला आहे. आजही गांधी कुटुंबावरील हा धोका टळलेला नसताना सुरक्षा व निवासस्थान काढून घेणे हे भाजपाचे हीन राजकारण आहे. प्रियंका गांधी यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे भेदरलेले भाजपा सरकार त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, पण अशा कृतींना प्रियंका गांधी व काँग्रेस भीक घालत नाही. यापुढेही जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवत राहू व लोकशाही विरोधी केंद्र सरकारविरोधात आवाज उठवू,” असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयानं बुधवारी प्रियंका गांधी यांना नोटीस दिली. यात एका महिन्याच्या अवधीत दिल्लीतील लोधी इस्टेट येथील सरकारी बंगला रिकामा करण्यात यावा, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत प्रियंका गांधी यांना हा बंगला सोडावा लागणार आहे. सुरक्षा व निवासस्थान काढून घेण्याच्या केंद्राच्या निर्णयावर थोरात यांनी मोदी सरकारवर टीका केली.

“प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता पाहून केंद्रातील भाजपा सरकार घाबरले आहे. राहुल गांधी व प्रियंका गांधी सातत्याने भाजपा सरकारच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जाब विचारत आहेत. त्यामुळे भाजपाची कोंडी होत असून, त्यांनी प्रश्न विचारू नयेत म्हणूनच त्यांच्यावर दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारकडे नाहीत म्हणून अशी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपा सरकार करत आहे. भाजपा सरकारने कितीही दबाव आणण्याचा प्रयत्न केला, तरी प्रियंका व राहुल गांधी हे जनतेच्या हितासाठी सरकारला प्रश्न विचारतच राहतील. सामान्य जनतेच्या प्रश्नांवर संघर्ष करत राहतील,” असं थोरात म्हणाले.

“त्यांची सुरक्षा करणं देशाचं कर्तव्यच”

प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याच्या निर्णयावर शरद यादव यांनीही सरकारवर टीका केली आहे. “प्रियंका गांधी यांना बंगला रिकामा करायला सांगण, याला मी सूडाचं राजकारणच मानतो. सरकारनं असं करायला नको. त्यांनी आपली आजी व वडिलांना गमावलं आहे. त्यांनी देशासाठी दिलेलं योगदान विसरता येणार नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा करणं हे देशाचं कर्तव्यच आहे. या निर्णयाचा फेरविचार करायला हवा,” असं शरद यादव यांनी म्हटलं आहे.